अहिल्यानगर (श्रीरामपूर) : राज्यातील क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्याचं विभाजन करत दुसरं मुख्यालय श्रीरामपूर येथे करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. हाच विधानसभा मतदारसंघ आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक, दिवंगत गोविंदराव आदिक, दिवंगत जयंत ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलं.
विखे पाटलांचा प्रभाव : बेलापूर स्टेशनच्या अवती-भवती वसलेली वस्ती पुढं श्रीरामपूर शहर म्हणून आकाराला आलं. आज हे शहर जिल्हा मुख्यालयाची मागणी करतय. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक आणि त्यांचे बंधु दिवंगत गोविंदराव आदिक, भानुदास मुरकुटे आणि दिवंगत जयंत ससाणे यांचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. हा मतदारसंघ आता राखीव आहे. पण विखे पाटलांचा प्रभाव या मतदारसंघावर राहिला. काही अपवाद वगळता काँग्रेसचंच प्राबल्य या मतदारसंघावर राहिलं.
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी मागणी : श्रीरामपूर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. जिल्हा मुख्यालयास लागणाऱ्या सर्व कार्यालये आणि त्यांच्या इमारती तालुक्यात आहेत. श्रीरामपूरला स्वतंत्र आरटीओ आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. जिल्ह्याच्या दृष्टीनं हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था तसंच रेल्वेची उपलब्धता येथे आहे. यामुळेच या जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर हा दुसरा जिल्हा व्हावा, अशी मागणी सातत्याने पुढे येत असते.
कसं आहे श्रीरामपूरचं राजकारण? : भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यातील अशोक सहकारी साखर कारखाना वगळता कोणत्याही नेत्याकडे मोठी संस्था नाही. गेल्या वेळच्या नगरपालिका निवडणुकीत दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांनी ससाणे गटाचा पराभव करत श्रीरामपूरचं नगराध्यक्ष पद मिळवलं होतं.
विद्यमान आमदारांविषयी माहिती : लहू कानडे यांनी 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ज्येष्ठ साहित्यिक व प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. नेवासा तालुक्यातील अतरवली हे त्यांचं मूळ गाव आहे. काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेल्या भाऊसाहेब कांबळे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केल्यानं लहू कानडे यांनी 2019 ला निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. यावेळीही ते काँग्रेसकडूनच उमेदवारी करु इच्छितात.
सध्याची राजकीय स्थिती : नेत्यांमधील वादामुळं श्रीरामपूरचं राजकारण चर्चेत राहिलं. तसंच कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी हेमंत ओगले आणि करण ससाणे असे तिघेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. दिवंगत गोविंदराव आदिक यांचे पुत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश आदिक हे तसंच मध्यंतरी बीआरएसमध्ये प्रवेश केलेले भानुदास मुरकुटे हे सध्या शिंदे गटाचे समर्थक आहेत. त्यामुळं तेही शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहेत.
विधानसभा 2019 ची आकडेवारी :
लहू कानडे - काँग्रेसचे विजयी उमेदवार
भाऊसाहेब मल्हारी कांबळे - शिवसेना पराभूत
काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे काँग्रेसकडून इच्छुक
काँग्रेसकडून हेमंत ओगले इच्छुक
शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे इच्छुक
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक
भाजपाकडून नितीन दिनकर इच्छुक
काँग्रेसमध्ये दोन गट : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत. काँग्रेस पक्षात अंतर्गतच दोन गट झाल्याचं दिसुन येत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे हे आपल्या पाच वर्षातील कामावर यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसकडून प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडं काँग्रेसचे माजी आमदार राहीलेले दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले करण ससाणे हे कानडे यांच्या विरोधात असुन, ते काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा -