मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं रविवारी रात्री दिली. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना त्यांनी 'पीटीआय'ला सांगितलं की, भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित : नव्या महायुती सरकारचा शपथविधी समारंभ 5 डिसेंबरला संध्याकाळी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. दुसरा कार्यकाळ काही दिवस टिकला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. आता त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी येणं जवळपास निश्चित झाल्याची माहिती भाजपाच्या एका नेत्यानं 'पीटीआय'ला दिली.
मुख्यमंत्री दरे गावाला का जातात?विधान परिषदेचे आमदार आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रिपदाची निवड आणि ईव्हीएमवरील विरोधकांच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नसून समन्वय आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार आहे. त्यावेळी तिन्ही पक्षांचे नेते शपथ घेणार आहेत". एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले," एकनाथ शिंदे थकले की आराम करायला गावी जातात. पण, त्यामधून सगळेच राजकीय अर्थ काढत आहेत. एकत्र वाटचाल केली नाही तर जनतेत चांगला संदेश जाणार नाही. हीच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची भावना आहे".
त्यांनी आत्मपरीक्षण करावे-विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएमबाबत महाविकास आघाडीकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यावर आमदार दरेकर म्हणाले, " जेव्हा ते (महाविकास आघाडी) जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगले काम करते. पण हरले की ईव्हीएम बिघडते. असे म्हणणे योग्य नाही. पराभवामुळे ते नाराज असताना त्यांनी आत्मपरीक्षण करावे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत त्यांचे जास्त खासदार निवडून आले. राजकारणात जय-पराजय असाच होत राहतो".
- 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा : राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली होती.
हेही वाचा
- "नाना पटोले आरएसएसचे एजंट", काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा हल्लाबोल, पक्षानं धाडली नोटीस
- 'लाडकी बहीण योजने'तील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांना संशय
- "माझी प्रकृती ठीक"; एकनाथ शिंदे ठाण्यात परतले, राजकीय घडामोडींना वेग