नागपूर : राज्यात बुधवारी विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडल्या. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६५.११ टक्के मतदान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के एवढं मतदान झालं. तर मुंबई शहर ५२.०७ टक्के आणि मुंबई उपनगरात ५५.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. वाढलेल्या मतदान टक्क्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रात आम्ही सत्तेवर येऊ : “महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, तेव्हा तेव्हा भाजपा आणि मित्र पक्षांना फायदा झालेला आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा आम्हाला फायदा होईल. महाराष्ट्रात आम्ही सत्तेवर येऊ असा विश्वास आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter) महिलांचं मतदान वाढलं आहे का? : “महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आम्ही बूथ सर्टिफिकेट गोळा केलेत. मी 20 ते 25 मतदारसंघात फोनवर बोललो. त्यांचं म्हणणं आहे की, महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळं लाडक्या बहिणींची भूमिका महत्त्वाची असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.
अपद्य कुणाला संपर्क केलेला नाही : राज्यातील निवडणुकीचा निकाल हा येत्या 23 तारखेला जाहीर होणार आहे. निकालानंतर दोन्ही आघाड्यांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आकड्यांची जुळवाजुळव करणं महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांना संपर्क केला जात आहे का? यावर फडणवीस म्हणाले की, "आम्ही अद्याप कुणाशी संपर्क साधलेला नाही."
मुख्यमंत्रिपदाबाबत निकालानंतर निर्णय होईल : निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं त्यांनीच सांगितलं होतं. "महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झालेली नाही. निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करू," अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
सरकारबद्दल लोकांच्या मनात आपुलकी : मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? यावर ते म्हणाले की, "मला असं वाटतं मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीनं वाढली आहे, त्यामध्ये Pro Incumbency फॅक्टर आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल थोडी आपुलकी आहे, असं त्याचा अर्थ आहे."
हेही वाचा -
- 'सरकारकडून अपेक्षा करायच्या असतील तर आधी मतदान करा'; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, बिटकॉईन प्रकरणी केलं मोठं भाष्य
- पालघरमधील वाढीव मतदानाचा फायदा कोणाला? महायुती, महाविकास आघाडी, की बहुजन विकास आघाडीला?
- राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा व्हिडिओ