मुंबई :आज संपूर्ण राज्याचं लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडं लागलंय. हे दोन्ही नेते आपल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलणार? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दादरच्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असून, संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे येण्यास सुरुवात झालीय. मात्र, यावर्षी ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जमिनीवर बसण्याची अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघणार आहे.
शिवाजी पार्कमध्ये चिखल : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांची अनेक दसरा मेळाव्यातील भाषणं याच मैदानावर गाजलीत. त्याच भाषणांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळालीय. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. या दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे शिवसेनेचे कार्यकर्ते जमिनीवर बसून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषणही कार्यकर्ते जमिनीवर बसून ऐकत आले आहेत. मात्र, मागील काही दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसानं आता शिवाजी पार्कमध्ये चिखल साचला असून, कार्यकर्त्यांना बसण्याची गैरसोय झालीय.