पालघर Nana Patole On BJP: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतकरी युवक आत्महत्या करत आहेत. युवतींवर हल्ले होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. महिलांची नग्नधिंड काढली जात आहे. या सर्व प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमांना चिखल फासण्याचं आंदोलन (Mud Throw Protest) हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.
उद्धव ठाकरेंवर भाष्य करण्यास दिला नकार : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पटोले पालघर येथे आले होते. यावेळी त्यांनी कोकण पदवीधर मतदार, मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघ या चारही विधान परिषदेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्ताचे उदाहरण देऊन फुले पडती शेजारी असे विधान केलं होते. त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
भाजपाचे मगरीचे अश्रू : गेल्या एक वर्षापासून मणिपूर जळत आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. भारत मातेला वेदना होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र या विषयावर मौन बाळगून आहेत. एक वर्षानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोन्ही समाज घटकांची बैठक घेण्याचं सुचत, अशी टीका करून पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे हे मगरीचे अश्रू असल्याचा आरोप केलाय.
लालकृष्ण अडवाणींनी केलं होतं राहुल यांचं कौतुक: माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली होती. त्यांना महानायक म्हटलं होतं. त्या राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा करून देश जोडला. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणलं, ज्या मणिपूरमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी अजून गेले नाहीत. त्या मणिपूरमधून राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ न्याय यात्रेला सुरुवात केली. ते या युगाचे जननायक आहेत, असं पटोले यांनी सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांचा ५४ वा वाढदिवस पालघरमध्ये साजरा करण्यात आला.
राज्यात सुशिक्षित तानाशाहीच्या विरोधात :राज्यातील सुशिक्षित वर्ग तानाशाहीच्या विरोधात असून तो आता भाजपाच्या विरोधात गेला असून महाराष्ट्रातील चारही विधान परिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात दहा वर्षात दहा पिढ्या बरबाद करण्यात आल्या. बेरोजगारी प्रचंड वाढली. सुशिक्षितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं, ही निवडणूक शिक्षक, पदवीधर मतदारांपुरत मर्यादित नाही, तर ती अन्यायाच्या विरोधात आहे, असं ही पटोले म्हणाले.
गुजरातच्या हितासाठी वाढवण बंदर : स्थानिक नागरिकांचा वाढवण बंदराला विरोध असतानाही केवळ गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार वाढवण बंदराचा विकास करत आहे. भाजपाच्या खासदाराचा वाढवण बंदराला लोकमान्यता असल्याचा गैरसमज झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार केल्याचं पटोले यांनी सांगितलं. बुलेट ट्रेन, वाढवण, बंदर मुंबई-वडोदरा महामार्ग अशी कितीही पायाभूत विकासाची कामे केली तरी, ती खासगीकरणातून असल्यानं पालघर जिल्ह्यातील एकालाही रोजगार मिळाला नाही, असे निदर्शनास आणले. वाढवण बंदराबाबत आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वाढवण बंदराचा विकास करणार म्हणजे काय करणार, किती लोकांना रोजगार देणार अशी विचारणा त्यावेळी मी केली होती. परंतु सरकारनं त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नव्हतं. लोकांचा विरोध असताना निसर्ग आणि मच्छीमारांचे नुकसान करून वाढवण बदंर निर्मितीसाठी सरकार हिटलरशाहीनं वागत असेल, तर या सरकारला विधान परिषदेच्या निवडणुकीतच धडा शिकवावा लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला.