मुंबई Jitesh Antapurkar Joins BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी (30 ऑगस्ट) भाजपामध्ये प्रवेश केला. गुरुवारी (29 ऑगस्ट) त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. जितेश अंतापूरकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांचे आणखी सहकारी भाजपात येणार :नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते जितेश अंतापुरकर यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नांदेड जिल्ह्याचे तरुण नेते जितेश अंतापुरकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत अंतापुरकर यांचे वडील रावसाहेब यांनी सुद्धा एकत्र काम केलं. आमच्या सोबत ते विधानसभेमध्ये सुद्धा होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचं काम पुढं नेण्याची जवाबदारी आता जितेश अंतापुरकर यांची आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपा पक्षाचं काम मोठं आहे. त्यातच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षाला मजबूती आली आहे. आता अशोक चव्हाण यांचे सहकारी सुद्धा भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करत आहेत. विद्यमान आमदार असून सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जितेश अंतापुरकर यांनी घेतल्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो."
लोकसभेत फेक नरेटिव्हचा फटका : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "नांदेड लोकसभेची जागा यावेळी आपण फार कमी मतानं हरलो. फेक निरेटिव्हचा फटका आपणाला बसला. परंतु असं असलं तरी आता लोकसभेनंतर नांदेड जिल्ह्यातील चित्र बदललं आहे. अशोक चव्हाण यांचे इतरही सहकारी जे कोणी राहिले असतील ते सुद्धा भाजपात प्रवेश करतील," असंही फडणवीस म्हणाले. "या विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष हा महायुतीचा असेल," असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.