मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. अशात अनेक नाराज नेत्यांनी बंडखोरी करत शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडी असो वा महायुती, यातील घटक पक्षांनी ज्या प्रकारे उमेदवारांची यादी घोषित केली, त्यावर नजर टाकली असता भाजपानं मित्र पक्षांसह १५० पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्या खालोखाल महाविकास आघाडीच्या काँग्रेसनं १०० पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडीत आपणच 'थोरला भाऊ' असल्याचं स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मारली बाजी : या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारांच्या जागा वाटपात शंभरी गाठण्याचा सुरुवातीपासून पूर्ण प्रयत्न केला. परंतु त्यांना तिथपर्यंत मजल मारता आली नाही. दुसरीकडं शिवसेनेनं भाजपाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षातून उमेदवारी देऊन सुद्धा त्यांना ९० पार आकडा करता आला नाही. तर जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारल्याचं चित्र आहे.
जागा वाटपात भाजपाचं वर्चस्व : महाविकास आघाडी असो वा महायुती, दोन्हीकडं कधी नव्हे इतका जागा वाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ताणला गेला. याला महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाची खुर्ची. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री या धोरणानुसार सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. २० ऑक्टोबरला भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी घोषित करत आघाडी घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं १०५ जागा जिंकून सुद्धा त्यांना विरोधात बसावं लागलं होतं.
१६० जागा लढवण्याचा निर्णय : राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गटाचे केवळ ४० आमदार असताना सुद्धा भाजपानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान केलं. त्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. या सर्वातून बोध घेत भाजपानं यंदा राज्यात १६० जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ते जवळपास यशस्वी झाले आहेत. इतकंच नाही तर भाजपाच्या नेत्या शायना एन सी, मुरजी पटेल यांना भाजपानं शिवसेनेत पाठवून तिथून उमेदवारी दिली. सोबतच गंगाखेड, बडनेरा, कलिना, शाहूवाडी या जागा भाजपानं मित्रपक्षाला सोडल्या. यावरून महायुतीत भाजपाचं वर्चस्व सिद्ध झालं.
महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत(उबाठा) मुंबई आणि विदर्भातील जागा वाटपावरून शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू राहिली. ठाकरेंनी त्यांच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. काँग्रेसनं त्यांच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं त्यांच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली. पहिली यादी घोषित करताना या यादीत सुरक्षित मतदारसंघांची घोषणा करण्यात आली. परंतु दुसऱ्या यादीपासून महाविकास आघाडीत चढाओढ बघायला मिळाली. ही चढाओढ चौथ्या आणि पाचव्या यादीपर्यंत कायम राहिली. अनेक मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्कीही काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्यावर आली. अखेर काँग्रेसनं जागा वाटपात शंभरी पार करत महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं.