कोल्हापूर CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले होते. यावेळी शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील बापट कॅम्पमधील अनंतपुरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लहानग्याचं मन राखून मुख्यमंत्र्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळं 'जनसामान्यांचे मुख्यमंत्री' ही ओळख पुन्हा एकदा शिंदेंनी अधोरेखित केली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांनी कापला केक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री काही कामानिमित्त शहरातील अनंतपुरम सोसायटीमध्ये आले होते. यावेळी या सोसायटीमध्येच राहणाऱ्या रिधान चावला या पाच वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण, लहानग्या रिधाननं काहीही करुन मुख्यमंत्र्यांसोबतच वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट आपल्या पालकांकडं धरला. अखेरीस पालकांनी धीर करुन मुख्यमंत्री या इमारतीमधून खाली उतरत असताना त्यांना रिधानसोबत वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी लहानग्या रिधानला आणि त्याच्या पालकांना केक घेऊन जवळ बोलावलं आणि रिधानचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पालक आणि मित्रमैत्रिणींच्या साथीनं केक कापून रिधानचा वाढदिवस साजरा केला. तसंच हा केक त्याला भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.