नाशिक CM Eknath Shinde in Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आले असता पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागानं पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या बॅगांची तपासणी केली. मात्र त्यात त्यांना कपडे,औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आढळल्या. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करावी असं म्हटलं होतं, यानंतर निवडणूक विभागानं आज ही तपासणी केली.
राऊतांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी नेतेमंडळी हेलिकॉप्टरनं प्रवास करत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत, एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर राज्यभरात मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक विभागाच्या उपस्थितीत पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. मात्र त्यात मुख्यमंत्र्यांचे कपडे औषधं आणि जीवनावश्यक वस्तू आढळून आल्यात. या तपासणीचं चित्रीकरण निवडणूक विभागानं त्यांच्या कॅमेऱ्यात केलंय.
संजय राऊतांचे आरोप काय : संजय राऊतांनी आरोप करताना म्हटलं होतं की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पैशांचा पाऊस दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे." तसंच संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत हेलिकॉप्टरमधून काही बॅगाही बाहेर काढत असल्याचं दिसत होतं. यावरुन राज्यभरात बराच गदारोळ झाला. त्यावर या बॅगांमध्ये कपडे होते, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोड शो : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकला आले होते. त्यांच्या उपस्थितीत नाशिक भागातील अशोक स्तंभ, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, सीबीएस, शालिमार आदी भागात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आणि उमेदवार हेमंत गोडसे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
राऊतांच्या 'त्या' आरोपानंतर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी, मात्र... - lok sabha election - LOK SABHA ELECTION
CM Eknath Shinde in Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ बॅगांमध्ये 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये घेऊन आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यानंतर आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले असताना हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागानं पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी (ETV Bharat Reporter)
Published : May 16, 2024, 6:01 PM IST