पुणे :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार झाला. नागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील डावलण्यात आल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसंच महायुती सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सुधीर मुनगंटीवार पक्षाचे नेते असून ते अध्यक्ष देखील राहिले आहेत, त्यांनी संघटनेत देखील काम केलं आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. पक्ष योग्य व्यक्तीसाठी योग्य निर्णय घेत असतो," असं बावनकुळे म्हणाले.
पुण्यात होत असलेल्या पुस्तक महोत्सवाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले, "पुणे शहरात पुस्तक महोत्सव होत आहे. या पुस्तक महोत्सवातून काहीतरी शिकण्यासाठी मी आलो आहे. देशात कुठेही एवढं मोठं आयोजन करण्यात आलं नाही. असं आयोजन पुस्तक महोत्सवात करण्यात आलं असून देशातील कानाकोपऱ्यातून लोक या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत."