छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024: राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात शरदचंद्र पवार विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तर यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीत मतांसाठी फिरावं लागत आहे: 'शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी'. तिथून ते बाहेर पडू शकत नाहीत, एक जागा अवघड जात आहे. पवार यांनी इतकी वर्षे त्या मतदार संघात घालवले. मात्र, त्याच ठिकाणी मतांसाठी रस्त्यावर फिरावं लागत आहे हे दुर्दैव आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलीय. तर उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये मोदींचा चेहरा वापरून १८ खासदार निवडून आणले होते. आता त्यांनी तितक्या जागा जिंकाव्या अन्यथा दुकान बंद करावं असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
सत्तेच्या लालसेपोटी ठाकरे काहीही करू शकतात : उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली, तर दुकान बंद करू असं सांगितलं. त्यांचं वाक्य उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवलं असतं तर बरं झालं असतं. मात्र, ते सोनिया याच्या दरबारी जाऊन बसले, औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची स्थापना झालेला उद्देश बाजूला सोडून सत्तेसाठी ते गेले. आपल्या मुलाचं भवितव्यासाठी सत्तेत जाण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार त्यांचा आत्मा आदित्य यांच्यामध्ये, शरद पवार यांचा आत्मा सुप्रिया यांच्यामध्ये अडकला आहे. राहुल गांधी निवडणुका झाल्या की, इटली युरोपमध्ये जाऊन आराम करतील. मात्र, मोदी तसे नाहीत ते रोज काम करतात, असं बावनकुळे यांनी सांगितलं.