चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं (शरदचंद्र पवार) पक्षप्रवेश स्पष्टपणे नाकारल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अखेर रविवारी (27 ऑक्टोबर) आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपात प्रवेश केला. सुरुवातीला जोरगेवार यांच्या भाजपा प्रवेशाला तीव्र विरोध करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार जोरगेवार यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळं आता जोरगेवार यांना चंद्रपुरातून भाजपाची उमेदवारी निश्चित झाल्याचं मानलं जातंय.
जोरगेवारांच्या पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले मुनगंटीवार? : किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशानंतर 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "जोरगेवार यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी होती, हे खरं आहे. मात्र, पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हा त्याचाच एक भाग आहे. परंतु, असं करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे", असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) किशोर जोरगेवार यांची राजकीय पार्श्वभूमी : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. तब्बल 72 हजार मताधिक्यानं त्यांनी भाजपाचे उमदेवार नाना शामकुळे यांना पराभूत केलं होतं. जोरगेवार यांनी निवडून येताच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. मात्र, यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत महाविकास आघाडी सोबत जाण्याचं ठरवलं. यादरम्यानच एकनाथ शिंदेंचं सरकार स्थापन झालं. त्यामुळं जोरगेवारांनी पुन्हा महायुतीची कास धरली.
सुधीर मुनगंटीवारांचा होता तीव्र विरोध :2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीकडून लढणार, अशी आशा जोरगेवारांना होती. मात्र, सुधीर मुनगंटीवारांचा किशोर जोरगेवार यांच्या उमेदववारीला तीव्र विरोध होता. "जोरगेवार यांनी अनेक पक्षांचा प्रवास केलाय. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. म्हणूनच त्यांच्याविरोधात भाजपात स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत आहे", अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी माध्यमांना दिली होती. महायुतीकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्यानं जोरगेवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं दार ठोठावलं. मात्र, राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे जोरगेवार यांच्या राजकीय भविष्यावर टांगती तलवार होती. मात्र, जोरगेवार यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली. भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर तिकीट मिळविण्यातही किशोर जोरगेवार यशस्वी ठरतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- "देवा, तू या लोकांना अक्कल देण्यात कंजुषी का केली?"; सुधीर मुनगंटीवारांचा 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत संतप्त सवाल - Sudhir Mungantiwar
- पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर कृषी विभागाचे गंभीर शेरे; अधिकाऱ्यांना खडसावत मुनगंटीवारांनी दिल्या 'या' सूचना - Pik Vima Yojana
- "पंतप्रधान तर सोडा गृहमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ न शकल्यानेचं शरद पवारांची..." - Sudhir Mungantiwar