कोल्हापूर : भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळं विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपा विरुद्ध ठाकरे असा वाद रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
धनंजय महाडिकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी : वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. "भाजपाच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून महिलांना धमक्या येत आहेत, असले प्रकार खपवून घेणार नाही," असा इशारा ठाकरे यांनी भाजपा आणि महायुतीला जाहीर सभेतून दिला होता. तसंच सोमवारी (11 नोव्हेंबर) कोल्हापुरात काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांनीही धनंजय महाडिक यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. "लाडक्या बहिणींना खुलेआम धमक्या देणाऱ्या धनंजय महाडिक यांना प्रचारापासून अलिप्त ठेवावं. त्यांच्या प्रचारावर बंदी घालावी," अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली होती.
उद्धव ठाकरेंवर कारवाईची मागणी (Source - ETV Bharat Reporter) उद्धव ठाकरेंविरोधात भाजपा आक्रमक : उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर आक्रमक होत, भाजपाच्या महिला शिष्टमंडळानं आज (12 नोव्हेंबर) कोल्हापुरात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, याबाबत निवेदन दिलं. कारवाई होईपर्यंत भाजपा महिला आघाडी स्वस्त बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांनी यावेळी दिला.
कोल्हापुरात भाजप विरुद्ध ठाकरे वाद पेटणार : धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळं महायुती बॅकफुटवर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगानंही धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. जिल्ह्यातील 10 जागांवर महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी अटीतटीची लढाई होत असून प्रचारात महाडिकांचं वक्तव्य महायुतीला भोवणार का? जिथं काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होत आहे, अशा मतदारसंघात महाडिक यांच्या वक्तव्यांनं महायुतीला दणका बसणार का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.
हेही वाचा
- नरेंद्र मोदी यांच्या सभेला व्हीआयपी पास असूनही प्रतिथयश गायकाला एन्ट्री नाकारली, एक चूक पडली महागात
- अजित पवार यांची मोठी खेळी! मुख्यमंत्र्यांची श्रीरामपूरमधील सभा केली रद्द, काय कारण?
- कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशातील भाजपा कार्यकर्ते फडणवीस यांच्या मतदारसंघात; पाहा व्हिडिओ