ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांचं त्यांनी कौतुक केलं. "आघाडी सरकारनंच दहशतवादी कसाबला बिर्याणी खावू घातली होती," असा आरोप जेपी नड्डा यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर केला.
नड्डांची ठाण्यात प्रचार सभा : ठाण्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच रंगलंय. भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संजय केळकर यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय नेते ठाण्यात हजेरी लावत आहेत. प्रचारासाठी शुक्रवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ठाण्यात आले होते.
यूपीएनं कसाबला बिर्याणी दिली : "यूपीए सरकारच्या काळातच मुंबईत 26/11 दहशतवादी हल्ला झाला होता. यूपीए सरकार पाकिस्तानात जात होतं. तसंच त्यांनीच दहशतवादी कसाबला बिर्याणी दिली होती. पण उरीमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला आम्ही 15 दिवसात प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी हल्ला झाल्याच्या 15 दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं. पुलवामा विषयावर पाकिस्तानला एक शब्दही काढता आला नाही. पण इथे आपल्याच देशातील काँग्रेसचे नेते पुरावे मागत होते," असा घणाघात जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर केला.
ठाण्यातील गुरुद्वारामधून नड्डा यांना बाहेर काढलं? : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जेपी नड्डा ठाण्यात आले होते. ठाण्यातील गुरुद्वारामधून नड्डा आणि ठाणे शहर विधानसभेचे भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांना बाहेर काढण्यात आल्याचं व्हि़डिओत दिसत आहे. "गुरुद्वारामध्ये मोठया प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यात गुरुनानक जयंतीनिमित्तानं धार्मिक कार्यक्रम सुरू होते. या गर्दीमुळं कार्यक्रमात अडचण निर्माण झाली होती," अशी माहिती तेथील सेवेकऱयांनी दिली. "हा प्रकार म्हणजे प्रार्थनेमध्ये झालेला भंग आहे. यातूनच सर्वच राजकीय पक्षांनी बोध घेतला पाहिजे. धार्मिक स्थळाला जाताना तिथले नियम पाळले पाहिजेत," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. दरम्यान, यावर भाजपाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा
- फडणवीस, अजित पवारांना पराभवाची चाहूल, म्हणून मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धेत नसल्याचे सांगताहेत, रमेश चेन्नीथलांचं टीकास्त्र
- शिंदेंनी राजकारण गढूळ केल्याच्या टीकेवरून वाद; राऊत अन् केसरकर नेमकं काय म्हणाले?
- "हवाओंका रूख बदल चुका है", देवेंद्र फडणवीसांचा पृथ्वीराज चव्हाणांना सूचक इशारा