नवी दिल्ली BJP Manifesto : भारतीय जनता पार्टी (भाजपा) नं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर संपूर्ण देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करेल, ही मोठी घोषणा भाजपानं केलीय. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पक्षाचं 'संकल्प पत्र' विकसित भारताच्या चार मजबूत स्तंभांना तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी सक्षम करेल.
वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी : भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय की, “निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलीय. आता आम्ही त्यांच्या शिफारशींच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काम करु.” यासोबतच सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये सामायिक मतदार यादीची तरतूदही ठेवण्यात येणार आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यात आणखी काय? : भाजपानं जाहीरनाम्यात 50 हजार रुपयांची कर्जमर्यादा वाढवून ती देशातील खेड्यापाड्यात आणि शहरांपर्यंत वाढवली जाईल, असं आश्वासन भाजपाच्या ठराव पत्रात देण्यात आलं होतं. तसंच 70 वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणून मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. आणखी तीन कोटी घरे बांधण्याचा ठराव घेण्याचं आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आलंय. त्याचबरोबर आता स्वस्त स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरात पाईपद्वारे पोहोचवला जाणार आहे.
गरिबांसाठी काय : भाजपाच्या जाहीरनाम्यात म्हटलंय की, “आम्ही 2020 पासून 80 कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत रेशन देत आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पुढील पाच वर्षे मोफत रेशन सुरु राहणार आहे. यासोबतच गरिबांचं ताटही सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. गरिबांच्या आरोग्य सुविधा लक्षात घेऊन कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिलं जात होतं आणि भविष्यातही असेच सुरु राहणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार केला जाईल.
वीज बिल शून्यावर आणण्याचं आश्वासन :आता भाजपानंही कोट्यवधी कुटुंबांची वीजबिल शून्यावर आणण्यासाठी काम करण्याचं आश्वासन दिलंय. ज्या अंतर्गत पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेवर वेगानं काम केलं जाईल, घरात वीज मोफत असेल आणि अतिरिक्त वीज विकून कमाई देखील केली जाईल. याशिवाय ट्रान्सजेंडर्सनाही आयुष्मान योजनेशी जोडलं जाणार असून आगामी पाच वर्षे महिला शक्तीच्या नव्या सहभागाची असतील.