पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी भाजपाला मागोमाग धक्के देण्यास सुरुवात केली. याआधी समरजित घाटगे त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि आता पुण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती संजय काकडे यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींना दिली.
दसऱ्यानंतर करणार प्रवेश : संजय काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत. मागील काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं भाजपाला पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
भाजपानं माझा वापर केला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपाला मोठा धक्का मानला जात असून, भाजपाला पुणे शहरात फटका बसण्याची शक्यता आहे. समरजितसह घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता संजय काकडे भाजपाची साथ सोडणार आहेत. गेल्या 10 वर्षात पक्षाकडून काहीही मिळालं नसून, भाजपाकडून फक्त वापर झाला असल्याची खदखद काकडे यांनी व्यक्त केली. औपचारिक्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.