मुंबई Pankaja Munde : राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून यात भाजपा नेत्या पंकजा मुंडेचा विजय झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली आहेत. त्यामुळं या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पंकजा मुंडेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला होता. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी त्यांना तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, 2019 च्या विधानसभेतील पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवास त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळं आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं 10 वर्षानंतर पंकजा मुंडेंनी विजयाचा गुलाल उधळला.
लोकसभा निवडणुकीत पराभव : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यांचं राजकीय पुनर्वसन केवळ चर्चेतच राहिलं. यादरम्यान भाजपाकडून अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी मिळाली. मात्र, पंकजा मुंडेंना वेट अँड वॉच करावं लागल्याचं पाहायला मिळालं. यात विशेष म्हणजे गोपीनाथ मुडेंचे समर्थक असलेल्या डॉ. भागवत कराड यांना भाजपानं राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीयमंत्री बनवलं. परंतु पंकजा मुंडेंना पुन्हा प्रतिक्षाच करावी लागली. अखेर नुकत्याच झालेल्या लेकसभा निवडणुकीत भाजपाकडून बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि बीडमधील सामाजिक असमतोलतेचा फटका बसल्यानं त्यांना अल्पशा मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.