मुंबई: होणार, होणार म्हणून ज्या निर्णयाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता करत होती, तो निर्णय अखेर जाहीर झाला. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाचे नेते पर्यायाने राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या भाजपाच्या महाराष्ट्रातील निरीक्षकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
विक्रमाचे 'इंद्र' देवेंद्र :संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात दिवंगत वसंतराव नाईक वगळता कोणत्याही नेत्याला न जमलेली कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवली आहे. 2019 च्या राजकीय अस्थिर वातावरणात काही तासांचे मुख्यमंत्री राहण्याचा नकोसा विक्रम नावावर करण्यापूर्वी त्यांनी 2014 ते 2019 असा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आतापर्यंत दिवंगत वसंतराव नाईक यांनाच 1962 ते 1967 दरम्यान मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर ए आर अंतुले, मनोहर जोशी या दिवंगत नेत्यांसह शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही ही किमया साधता आली नव्हती. कोणत्या न कोणत्या कारणाने या सर्व नेत्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. शिवाय मराठा समाजाचं राजकीय प्राबल्य असलेल्या महाराष्ट्रात दिवंगत मनोहर जोशी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
साखळी तोडली : या निमित्ताने आणखी एक अनोखा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जमा झाला आहे. 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात 10 उपमुख्यमंत्री झाले. यातल्या एकाही उपमुख्यमंत्र्याला आतापर्यंत आपल्या पदासमोरचं 'उप' काढून मुख्यमंत्री बनण्यात यश लाभलं नाही. राज्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अख्खी शिवसेनाच आपल्याबरोबर आणल्यानंतर सत्तास्थापनेच्या वेळेस 105 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आणि ते नाव देवेंद्र फडणवीस यांचंच असणार, हे निश्चित मानलं जात होतं. मात्र भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवलं आणि आधी मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाचा गाडा कुशलतेने हाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले. फडणवीस यांनी अनिच्छेने ते पद स्वीकारलं. तेव्हापासून म्हणजे 2022 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले. कदाचित भविष्यात नवं प्रमोशन घेऊन 'पुन्हा येईन' याचा अंदाजही फडणवीसांना आला नसेल.