अमरावती Amravati Assembly Constituency : भाजपा मुस्लिम विरोधी आहे, म्हणून काँग्रेस सतत बोंबा मारत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला अमरावती विधानसभा मतदारसंघात 64 हजार मुस्लिमांची मते मिळाली. मुस्लिमांच्या ताकदीवर काँग्रेसचा विजय झाला असून आता विधानसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात व्होटबँक म्हणून ज्या मुस्लिम समाजाचा उपयोग करून घेतला. आता या मुस्लिम समाजातील व्यक्तीला अमरावती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीनं करण्यात आलीय. या संदर्भात भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसनं आता अमरावतीमध्ये 'मोहब्बत की दुकान सिद्ध करावं' असं म्हटलंय.
देशात काँग्रेसच्या यशामागे मुस्लिमांचे श्रेय: लोकसभा निवडणुकीत देशात सलग तिसऱ्यांदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा दारुण पराभव झाला, असं असताना काँग्रेस आपणच विजयी झाल्याच्या अविर्भावात वावरत आहे. देशात काँग्रेसच्या ज्या काही थोड्याफार जागा वाढल्या आहे किंवा देशभर जी काही मतांची टक्केवारी वाढली आहे त्याचं संपूर्ण श्रेय मुस्लिम समाजाला जातं अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे खरे श्रेय हे मुस्लिम मतदारांचे आहे. त्यातही अमरावती विधानसभा मतदारसंघात मिळालेली आघाडी अतिशय निर्णायक असून अमरावतीत काँग्रेसला मिळालेल्या विक्रमी आणि निर्णायक आघाडीचे संपूर्ण श्रेय हे मुस्लिमांचं असल्याचं देखील शिवराय कुलकर्णी यांनी सांगितलं.
काँग्रेसपेक्षा मुस्लिमांचे योगदान मोठे: लोकसभा निवडणुकीत आपल्याला मते मिळावी यासाठी काँग्रेसनं पाठवलेले पैसे परत करून, मुस्लिम समाजाने चंदाजमा करून काँग्रेसच्या उमेदवाराला स्वतः बळ दिले. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांपेक्षा मुस्लिम समाजाचे योगदान फार मोठे आहे, असं शिवराय कुलकर्णी यांनी म्हटलंय.