मुंबई Uddhav Thackeray On BJP :जनता दल युनायटेड पक्षाचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'इंडिया' आघाडीला सोडून 'एनडीए'त सामील झाल्यामुळं राज्यातील जेडीयू पक्षातील अनेक नेते नाराज झाले. कपिल पाटील यांनीही जेडीयू पक्षाला रामराम ठोकला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आमदार कपिल पाटील यांनी 'समाजवादी गणराज्य पार्टी' नावानं पक्षाची घोषणा केलीय. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
'माजवादी' विरुद्ध समाजवादी लढाई : यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला सबोधित करताना म्हणाले की, "कपिल पाटील यांनी हौस भागवण्यासाठी पक्ष काढला नाही. ज्यावेळेस देशाला लढवय्यांची गरज आहे, अशा वेळेस पक्ष काढला. पक्षाला नाव देखील चांगलं ठेवलंय. मला अनेक जण विचारतात की, तुमचा नक्की विरोध कशाला आहे? तर तुमच्या पक्षाचे नाव घेऊन सांगतो, आता 'माजवादी विरुद्ध समाजवादी' लढाई होणार आहे. एका बाजूला माजलेले माजवादी तर दुसऱ्या बाजूला समाजवादी आहे. तुम्हाला माजलेले लोकं पाहिजेत की, समाजवादी म्हणजेचं तुम्हाल समजून घेणारे लोक हवे आहेत? याचा निर्णय आता तुम्हालाच घ्यावा लागणार आहे."
फक्त भुलथापा सुरु आहेत : "एक गोष्ट खरी आहे की, नितीश कुमार किंवा अशोकराव आपल्याला सोडून जातील असं कधी वाटलं नव्हतं. कारण सगळ्यात आधी देशामध्ये भाजपाविरुद्ध आघाडी व्हावी, अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते तर नितीश कुमार माझ्या घरी आले होते. 'इंडिया' आघाडीची सुरुवात चांगली झाली. दोन-तीन बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता. मी काय त्या सगळ्याच खोलात जाणार नाही. आमची दोन वेळा फसगत झाली आहे. पंचवीस-तीस वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. आम्ही दोन वेळा मोदी यांच्या भूलथापांना बळी पडलो होतो. मोदी यांच्याकडून आता देशात फक्त फसवाफसवी सुरू आहे," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.
आपकी बार भाजपा तडीपार : "गेल्या दहा वर्षात नामांतर मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. योजनांची नावे, स्टेशनचं नाव , शहरांचं नाव बदलली जात आहेत. मात्र आम्ही सत्तेत असतांना दोन शहरांचं नाव मी बदलली याचा मला अभिमान आहे. एकाचं छत्रपती संभाजीनगर केलं तर दुसऱ्याचं धाराशिव केलं होतं. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र आता यांनी जुमल्याचं नावसुद्धा गॅरंटी म्हणून केलं," असा टोला ठाकरे यांनी लागवलाय. तसेच दिल्लीचं तक्त फोडावा लागेल आणि आपलं तक्त तेथे बसवावं लागेल. यांची जी मिजाज आहे आपकी बार 400 पार, मी म्हणतो "आपकी बार भाजपा तडीपार' असा नारा ठाकरे यांनी दिलाय. तसेच कसं 400 पार जाता, असा इशारा देखील त्यांनी भाजपाला दिलाय.
लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सोबत आहोत : जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएसोबत गेले. त्यामुळं इंडिया आघाडीला धक्का बसलाय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळं महाराष्ट्र जेडीयूमधील नाराज नेत्यांनी आणि कपिल पाटील यांनी जेडीयू पक्षाला रामराम ठोकला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आमदार कपिल पाटील यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केलीय.
आमदार कपिल पाटील यांचा नवीन पक्ष : "समाजवादी ऐक्याचा धम्मघोष, समाजवादी गणराज्याचा संकल्प" असा नारा देण्यात आला. रविवारी धारावीत संयुक्त समाजवादी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. "संविधान वाचविण्यासाठी आम्ही आपली साथ देणार आहोत. तसेच उद्धव ठाकरे आपण जे सरकार राज्यात आणणार आहात, त्या सरकारात आम्हाला थोडी जागा मिळेल असा विश्वस आहे. यापूर्वी तीन वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. आम्ही समाजवादी आहोत. आम्ही लढत राहू," असं कपिल पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- ठरलं! महाविकास आघाडीची यादी 'या' तारखेला होणार जाहीर; 19 ते 20 जागा काँग्रेस लढवणार
- सुनेत्रा पवारांच्या विजयाबाबत रुपाली चाकणकरांना विश्वास; म्हणाल्या....
- माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या वाहनावर भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी फेकली गाजरं, नेमकं कारण काय?