नागपूर BJP Aggressive Against Congress : शनिवारी संध्याकाळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनर्सचं विद्रुपीकरण केल्याच्या विरोधात भाजपा पक्ष आक्रमक झालाय. आज नागपूर शहर भाजपा आणि ग्रामीण भाजपाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या परिसरात स्वतंत्रवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल्यानंतर, जिल्हा परिषद परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनर्सचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलीसांनी रविवारी अटक केलीय.
'या' पुस्तकावर सुनील केदारांचा फोटो : जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदारांचा फोटो छापल्यामुळं, जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्प फाडून त्याची सभागृहाबाहेर होळी केली होती. सभागृहातील सदस्यांचा रोष व्यक्त करण्याचा हा सनदशीर मार्ग असताना जाणीवपूर्वक सदस्यांचं निलंबित करण्यात आलं. एवढेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डींगला काळं फासण्यात आलं. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला काळं फासणं हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचं समर्थन होत आहे, हे निषेधार्ह आहे.
भाजप आक्रमक, सत्ताधारी काँग्रेस बॅकफूटवर : नागपूर जिल्हा परिषद येथे पंतप्रधान मोदी यांचे योजनांचे बॅनर लागले होते. त्या बॅनरला कुणाल राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोटोला काळ फासलं होतं. त्यावेळी प्रशासनाला फोन करून असं कृत्य कोणी केलं याची चौकशी केली. या घटनेला नागपूर जिल्हा परिषदेचं कोणतेही पदाधिकारी आणि महाविकास आघाडी जिल्हा परिषद सदस्य समर्थन करणार नाही असं, रश्मी बर्वे, महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान हे कुठल्याही पक्षाचे नाही तर हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते एक संविधान पदावर बसले आहेत. म्हणून असं कृत्य करणाऱ्या लोकांचे नागपूर जिल्हा परिषद समर्थन करत नाही असं स्पष्ट केलं.