नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ पाटणा Bihar Politics : बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झालं आहे. नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासह विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली. शपथ घेताच राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या.
महाआघाडी सरकारचा अंत : बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यासह राज्यातील 17 महिन्यांच्या महाआघाडी सरकारचा अंत झाला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी NDA विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली, जिथे त्यांची नेता म्हणून निवड करण्यात आली. यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
'इंडिया' आघाडीला मोठा धक्का : राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार जेडीयू आमदारांच्या बैठकीत म्हणाले की, आता एकत्र राहणं कठीण आहे आणि राजीनामा देण्याची वेळ आली आहे. नितीश कुमार यांचं हे पाऊल 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का मानला जातोय, ज्याचे ते स्वतः शिल्पकार होते.
बिहारमध्ये एनडीएचे प्रमुख : नितीश कुमार यांना बिहारमध्ये एनडीएचा प्रमुख बनवण्यात आलंय. राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, महाआघाडीतील परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे मी हे पाऊल उचललं. 'महाआघाडीत काही ठीक नसल्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांची मतं आणि सूचना मला मिळत होत्या. त्या सर्वांचे म्हणणं ऐकून मी आज राजीनामा दिला, असं नितीश कुमार म्हणाले होते.
हे वाचलंत का :
- मराठमोळ्या विनोद तावडेंची बिहारमध्ये चर्चा; सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका