अमरावती : "मला पक्षानं निष्कासित केलं ही केवळ कागदी कारवाई आहे. राजकीय पक्षांनं हे असं करावंच लागतंच. खरंतर मी भाजपाचा अनधिकृत उमेदवार आहे" असं अमरावती विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता यांचं म्हणणं आहे. आपला जाहीरनामा घोषित करण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपाचा इतिहास तपासा : 1995 मध्ये बुलडाणा जिल्ह्यात भाजपाचे बंडखोर जैनसुख संचेती हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी ते निवडून आलेत आणि निवडून आल्यावर पुन्हा भाजपात सहभागी झाले. भाजपाचा इतिहास तपासला तर हा इतिहास आपल्याला दिसेल. बुलढाणाच ज्याप्रमाणं झालं त्याचप्रमाणं आता अमरावती देखील होईल असं जगदीश गुप्ता म्हणाले. अमरावती शहरातील भाजपा आता पूर्ण ताकदीनिशी माझ्याच पाठीशी आहे असं देखील जगदीश गुप्ता यांनी सांगितलं.
लढत कोणासोबत हे जनताच सांगेल : "मतदार संघात माझी लढत नेमकी कोणासोबत आहे हे मी सांगू शकत नाही. काँग्रेसच्या उमेदवारांनी आपली लढत ही जगदीश गुप्ता यांच्यासोबत असल्याचं सांगून जगदीश गुप्ता यांचा विजय होणार हेच सांगितलं. मी मात्र माझी लढत कोणासोबत आहे हे सांगू शकत नाही. मी माझे विचार जनतेपर्यंत पोहोचवले आता जनताच खरच कोणाची कोणासोबत लढत आहे हे ठरवेल" असं जगदीश गुप्ता म्हणाले.
खोटे आरोप केले म्हणून भाजपा प्रवक्त्याला नोटीस : माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली म्हणून भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावली. आता तीस दिवसात त्यांचं स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे. त्यांनी आपली बाजू मांडली नाही तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई मी शंभर टक्के करणार असं जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -