मुंबई - विरारमधल्या नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये भाजपानं पैसे वाटल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडेंना घेरलंय. त्यामुळे हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. नालासोपाऱ्यातील प्रसिद्ध विवांता हॉटेलमध्ये हा राडा झाला असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय.
भाजपावर गंभीर आरोप : नालासोपारा मतदारसंघात भाजपाकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचं बोललं जातंय. नालासोपारा पूर्वेकडील विवांता हॉटेल येथे पैसे वाटले जात असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये धुमाकूळ घातलाय. विरार पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून, आमदार क्षितीज ठाकूर हेसुद्धा हॉटेलच्या ठिकाणी पोहोचलेत.
"नालासोपाऱ्यातील आमदारांची बैठक सुरू होती. मतदानाच्या दिवशीची आदर्श आचारसंहिता, मतदान यंत्रे कशी सील केली जातील आणि आक्षेप घ्यायचा झाल्यास काय करायचं, याबाबतची माहिती देण्यासाठी मी तिथे गेलो होतो. बहुजन विकास आघाडीचे अप्पा ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना वाटलं की, आपण पैसे वाटत आहोत. याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत. मी 40 वर्षांपासून पक्षात आहे, अप्पा ठाकूर आणि क्षितिज मला ओळखतात. तरीही माझा विश्वास आहे की निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करावी." - विनोद तावडे, सरचिटणीस, भाजपा
भाजपाकडून पैशांचा गैरवापर होतोय - ठाकूर : भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे मंगळवारी नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपाचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्यांच्यात बैठकही सुरू असतानाच बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले. याठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. हा प्रकार समोर आल्यानंतर नालासोपाऱ्याचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतलीय. तसेच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिलीय. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपाकडून पैशांचा गैरवापर होतोय आणि हे दुर्दैवी आहे, असं म्हणत क्षितिज ठाकूरांनी संताप व्यक्त केलाय.
"नालासोपारा येथे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आलेले निवडणूक यंत्रणेचे भरारी पथकही घटनास्थळी पोहोचले. फ्लाइंग स्क्वॉडने परिसराचा आढावा घेतला आणि संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार आहे." - किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी
हॉटेलमध्ये 5 कोटी घेऊन आले होते : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनीसुद्धा या प्रकाराबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त केलीय. विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे तिकडे बैठक सुरू असल्याचं सांगत आहेत. पण मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात हे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का? एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस या प्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे, असंही हितेंद्र ठाकूर म्हणालेत. याप्रकरणी विनोद तावडे यांनी जाऊ द्या माफ करा, अशी विनंती केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. हितेंद्र ठाकूर यांचे निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय. तसेच निवडणुकीदरम्यान 48 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी ती जागा सोडायची असते, अशी साधी अक्कल विनोद तावडे यांना नाही का? असा प्रश्न विचारलाय. निवडणूक आयोग एकंदरीत झाल्या प्रकाराबद्दल काय कारवाई करतात ते आपण बघणार आहोत, असेही हितेंद्र ठाकूर म्हणालेत.
भाजपचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत?… pic.twitter.com/d0sigpEajY
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2024
राष्ट्रवादीचे गंभीर आरोप : "भाजपाचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत? अडीच तास उलटूनही कोणतीच कारवाई का झालेली नाही?" असे प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर गंभीर आरोप केलेत.
हेही वाचा -