पाटणा Bihar Politics : बिहारमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा 'पलटी' मारतील असं स्पष्ट दिसतंय. नेत्यांच्या वक्तव्यांवरून आणि हालचालींवरून, नितीश कुमार एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, त्यांची जुन्या सहकाऱ्यांशी जवळीक वाढली आहे.
बिहारमध्ये 'गेम' नक्की होणार : आज ज्या प्रकारे नेत्यांची वक्तव्यं आली, त्यावरून बिहारमध्ये 'गेम' होईल हे नक्की. दुसरीकडे, महाआघाडीच्या नेत्यांनीही आपले सूर तीव्र केले आहेत. तर भाजपाचे नेते सध्या 'वेट अॅंड वॉच'च्या भूमिकेत आहेत. असं म्हटलं जातं की, राजकारणात सर्व काही शब्दांत दडलेलं असतं. त्यामुळे आज कोण काय बोललं, यावरून चित्र हळूहळू स्पष्ट होतंय.
राजद काय म्हणालं :पाटणा ते दिल्लीपर्यंत ज्याप्रमाणे हालचालींना वेग आला आणि सट्टेबाजीचा बाजार तापलाय, यावर राजदचे खासदार आणि लालू कुटुंबियांचे निकटवर्तीय मनोज झा यांनी प्रतिक्रिया दिली. "नितीश कुमारांनी आजच हा सर्व गोंधळ दूर करावा", असं ते म्हणाले.
जदयूचं प्रत्युत्तर :राजदच्या या भूमिकेनंतर जदयूनंही याला लागलीच उत्तर दिलं. पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले, "मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. नितीश कुमार आजही मुख्यमंत्री आहेत, उद्याही मुख्यमंत्री राहणार. ज्यांना शंका आहे, त्यांनी आपल्या शंकांचं निरसन करावं. सुशील मोदी हे गंभीर नेते आहेत. त्यांचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. त्यांनी बऱ्याच अंशी परिस्थिती स्पष्ट केली आहे".
भाजपाची भूमिका : दिल्लीहून परतताच भाजपाचे बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं. "राजकारणात कोणासाठीही दार कधीच बंद नसतं. बिहारबाबत केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो राज्यातील नेत्यांना मान्य असेल. आता आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागेल. दोन-तीन दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल", असं ते म्हणाले.
तेजस्वी यादव चहापानापासून दूर : उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आज राजभवनातील चहापानापासून दूर राहिले. यामुळे महाआघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. त्याचवेळी, नितीश कुमार यांची भाजपा नेत्यांशी असलेली जवळीक येथे दिसून आली. याबाबत नितीश कुमारांना विचारलं असता, "जे आले नाहीत त्यांना विचारा", असं उत्तर त्यांनी दिलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले, "आम्हाला फार पूर्वीच कळलं होतं. म्हणूनच आम्ही म्हणालो होतो, की गठबंधन पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार".
भाजपा नेत्यांचा सूर बदलला : एकेकाळी नितीश कुमारांसाठी खिडक्या-दारंही बंद ठेवण्याची भाषा करणाऱ्या भाजपा नेत्यांचा सूर आता पूर्णपणे बदलला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले, "भाजप हा कोणा एका व्यक्तीचा पक्ष नाही, तो सामूहिक नेतृत्वाचा पक्ष आहे. आमचं नेतृत्व सक्षम असून सामूहिक नेतृत्वाच्या निर्णयाचं पक्ष स्वागत करतो. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, "मला विश्वास आहे की केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल तो राज्य आणि पक्षाच्या हिताचा असेल."
हे वाचलंत का :
- बिहारमध्ये 'महागठबंधन'वर संकट, जीतन राम मांझीच्या पोस्टनंतर राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना वेग