छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Bachchu Kadu Criticized Mahayuti and MVA : "आम्ही सतरंजी उचलणारे आहोत. पण ज्यांच्यासाठी सतरंज्या टाकल्या त्यांचं वाटोळं केल्याशिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही", अशी टीका प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर केली. छत्रपती संभाजीनगर येथे परिवर्तन आघाडीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बच्चू कडू यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडलं.
मोदी सरकारनं देश खड्ड्यात घातला : यावेळी बोलत असताना बच्चू कडू म्हणाले की, "काँग्रेसवाल्यांची कोथळे बाहेर काढण्यासाठी ही सभा आहे. ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू. काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग आणला. पण शिफारस मान्य केली नाही. मग, मोदी आले. त्यांनीही देश खड्ड्यात घातला. धर्मा-धर्मात भिडवणे ही यांची पॉलीसी आहे. बाप मेला तरी चालेल, पण नेता जिवंत राहिला पाहिजे, असं धोरण राज्यात चाललंय. एकेका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. आम्ही छत्रपतींचे भक्त आहोत. ज्यानं शेतमालाला भाव दिला नाही, त्यांना आमचं मत नाही. काँग्रेसला वाटतं दलित, मुस्लिम आमच्यासोबत आहेत. भाजपाला वाटतं हिंदू आमच्यासोबत आहेत. पण आमच्यासोबत शेतमजूर आहेत."
दोन पक्षांचे खुर्द बुद्रुक असे भाग झाले : तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करत महायुती आणि मविआवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "राज्यात आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक झालं. पण हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी असे झालेत. 75 वर्षे होऊनही तेच प्रश्न आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या गावातील आरोग्यकेंद्रात इतकी घाण होती की, मी थांबू शकत नव्हतो. माझं यांना आव्हान आहे की, माझ्यासमोर बसून सांगा, किल्ल्यासाठी किती पैसे दिले? साडेचारशे कोटी खर्च करतो म्हणाले, पण किती केले सांगा? राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा बसवला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं होतं. 12 डिसेंबर रोजी सांगितलं की, योग्य पद्धतीनं काम झालं नाही. मात्र, तेव्हा कुणी काही बोललं नाही. विरोधक गप्प बसले होते", असे संभाजीराजे म्हणाले.