महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना मोठा धक्का; 'प्रहार'च्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Anil Gawande And Chandrashekhar Bawankule
अनिल गावंडे भाजपात प्रवेश (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 9:41 PM IST

Updated : Oct 26, 2024, 10:07 PM IST

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी शनिवारी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. गावंडे यांचा भाजपामध्ये प्रवेश होताच लगेच त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनिल गावंडे प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडल्यानं बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.



सई डहाके यांचा अजित पवार राष्ट्रवादी गटाला रामराम : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, राजकीय घडामोडींना वेग आलाय. पक्षात नाराज नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत आहेत. अशात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. अनिल गावंडे यांच्या प्रवेशामुळं अकोल्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. गावंडे यांच्यासोबत वाशिम जिल्ह्यातील माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी आणि कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सई डहाके यांनीही राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.


पक्ष खंबीरपणे गावंडे यांच्या पाठीशी : याप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले की, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष गावंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवत भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, विकासकार्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावंडे प्रयत्न करतील. आमदार संजय कुटे यांच्या पुढाकाराने गावंडे यांच्यासारख्या समर्थ नेतृत्वाने भाजपामध्ये प्रवेश केला. आगामी काळात पक्ष खंबीरपणे गावंडे यांच्या पाठीशी उभा राहून त्यांचा यथोचित सन्मान राखेल अशी ग्वाही याप्रसंगी बावनकुळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या : याप्रसंगी बोलताना गावंडे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवत शेतकऱ्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश करत आहोत. तसेच पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन."



वसंत देशमुख यांच्यावर कडक कारवाई करावी : वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपा निषेध करत असून अशा प्रकारचे वक्तव्य कदापी खपवून घेणार नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तसेच पक्षातर्फे देशमुख यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. देशमुख यांच्यावर पोलीसांनी, महिला आयोगाने कडक कारवाई करावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केलीय. तसेच देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा गैरफायदा घेऊन कुणीही सुजय विखे पाटील यांची नाहक बदनामी करू नये. सुजय यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या विरोधी पक्षांच्या हल्लेखोरांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. भाजपाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कसबातून हेमंत रासने रिंगणात, वाचा संपू्ण यादी
  2. भाजपाच्या लोकसभेला पडलेल्या महिला उमेदवार करणार विधानसभेचा प्रचार, तर रामदास आठवलेंना डच्चू
  3. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर, ठाकरेंनीही तीन उमेदवार केले जाहीर
Last Updated : Oct 26, 2024, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details