महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

विधानसभा निवडणुकीची घोषणा, पण राजकीय समीकरण बदलल्याने सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ

राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदललेली असल्याने छोट्या घटक पक्षांनीसुद्धा लॉबिंग सुरू केलंय. २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ उडालीय.

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

assembly election 2024
विधानसभा निवडणुकीची घोषणा (ETV Bharat File Photo)

मुंबई -विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, प्रचारासाठी राजकीय पक्षांकडे जेमतेम ३५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीमध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूकडे जागावाटपासह अद्याप अनेक गोष्टींवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच सध्याच्या परिस्थितीत राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदललेली असल्याने छोट्या घटक पक्षांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लॉबिंग सुरू केलंय. २९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ उडालीय.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असणार आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचा जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून, लवकरच हा तिढा व्यवस्थितपणे सोडवला जाईल, असे दोन्ही बाजूने सांगण्यात येत असलं तरीसुद्धा जागा वाटपासाठी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपाच्या वाट्याला येणार असून, महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं असल्याकारणाने काँग्रेस राज्यात सर्वाधिक जागांवर दावा करीत आहे. परंतु काँग्रेसच्या या दाव्याला उद्धव ठाकरे गटाकडून विरोध केला जात असून, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्याबाबत अद्यापही ठाकरे गट महाविकास आघाडीत दबाव निर्माण करीत आहे. तर महायुतीत लोकसभा निवडणुकीला बसलेला फटका लक्षात घेता शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटाने सावध पवित्र घेतला असून, दोन्ही गटाकडून जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी चुरस लागली आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत स्वतःची स्वतंत्र चूल उभी करण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरेंचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून केला जात असला तरीसुद्धा राज ठाकरे स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहतील, असे चित्र आहे.

छोट्या घटक पक्षांची लॉबिंग : दुसरीकडे छोट्या घटक पक्षांनीसुद्धा आपली स्वतंत्र चूल उभी करण्याचा निर्णय घेतला असल्याकारणाने याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली असून, अद्याप त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला नाही. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार जितेंद्र ठाकूर हेसुद्धा अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी राज्यात १८ ते २० जागा लढण्याचा निर्धार केला असून, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव मुंबई, महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, निवडणुकीची घोषणा झाल्याने आतापासूनच छोट्या घटक पक्षांनी लॉबिंग सुरू केलीय.

आदर्श आचारसंहितेचं पालन करायला हवं : निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यानंतर याबाबत बोलताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, सर्व राजकीय पक्षाने आदर्श आचारसंहितेचं पालन करायला हवं. ही निवडणूक विचारांनी लढायला हवी. आपल्या भाषणातून कुणावरही वैयक्तिक आरोप किंवा टीका टिप्पणी नसावी. एखाद्या व्यक्तीबद्दल समाजाबद्दल किंवा कोणाच्या धर्माबद्दल आरोप न करता या निवडणुकीला कुठल्याही पद्धतीने गालबोट लागू नये, याकरिता प्रत्येकाने सामाजिक भान व प्रतिष्ठा कायम ठेवणे गरजेचे आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाकडून कुठल्याही पद्धतीची चूक होणार नाही. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर आपणाला सर्वांना एकत्र राहायचं आहे. तसेच राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाने भान ठेवून आदर्श आचारसंहितेचं पालन करू या, अशी विनंतीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

मागच्या सरकारमध्ये अनेक घडामोडी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ जागा लढवून सर्वात जास्त १०५ जागा जिंकल्या होत्या, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १२४ जागा लढवून ५६ जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ तर काँग्रेसने ४४ जागी विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न भेटल्याकारणाने आणि सरकार स्थापन करण्यास कुणीही पुढाकार न घेतल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अखेर २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु २६ नोव्हेंबर २०१९ रोजी फ्लोअर टेस्ट पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. २९ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

भुजबळांनी घेतला होता आक्षेप?:२०१९ मध्ये २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि २४ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात आले होते. या तारखेवरून तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला होता. २१ तारखेला निवडणुका होत असताना निकाल २४ ऑक्टोबरला का? अशी विचारणा त्यांनी केली होती. २१ ऑक्टोबरला निवडणूक होत असेल तर २२ किंवा जास्तीत जास्त २३ ऑक्टोबरला मतमोजणी व्हायला हवी. आता निवडणुका ईव्हीएम मशीनवर होत असल्याकारणाने सर्व डेटा लगेच उपलब्ध होतो. जर यासाठी इतका उशीर लागला, तर ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा संशय लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतो, असा आरोप तेव्हा त्यांनी केला होता. परंतु यंदाही २० नोव्हेंबर रोजी निवडणुका होत असून, २३ नोव्हेंबरला निकाल घोषित होणार आहे. यादरम्यानसुद्धा दोन दिवसांचं अंतर असलं तरी मागच्या वेळी आरोप करणारे भुजबळ यंदा मात्र शांत आहेत.

हेही वाचा...

  1. "ईव्हीएम 100% फूलप्रूफ": मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले
  2. विधानसभा निवडणूक 2024 : नागपुरातलं राजकारण कूस बदलणार? देवेंद्र फडणवीसांची घरच्या मैदानातच कसोटी

ABOUT THE AUTHOR

...view details