मुंबई Ashish Shelar On Jarange Patil: मराठा नेते, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सातत्याने भाजपा तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला भाजपाकडून सातत्यानं उत्तर दिलं जात असलं तरी त्या उत्तरालासुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रतिउत्तर दिलं जात आहे. आता मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी टोकाची भूमिका घेत जरांगे पाटील यांना थेट शब्दात धमकावलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या हिताची भूमिका तुम्ही मांडत आहात तोपर्यंत तुमचं स्वागत आहे. परंतु त्यामध्ये राजकीय भूमिका मांडाल तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं शेलार म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते.
राजकीय भूमिका मांडाल तर सडेतोड उत्तर देऊ : जरांगे पाटील तुम्ही एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भूमिका ज्या ज्या लोकांनी घेतली, त्या लोकांच्याबद्दल थोडा अभ्यास करा, आम्ही समाजाबरोबरच आहोत आणि समाज आमच्या बरोबर आहे. पण तुमच्यासोबत सकल मराठा समाज आहे या गैरसमजात तुम्ही राहू नका आणि जर का तुम्ही निवडणुकीची भाषा बोलत असाल तर आम्ही तयार आहोत. आम्ही अशा बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभवही पचवले आणि विजयसुद्धा मिळवले. त्यामुळं तुम्ही निवडणुकीची भाषा आम्हाला शिकवू नये. तुम्ही जोपर्यंत समाजाची भूमिका मांडताय तोपर्यंत तुमचं स्वागत आहे आणि राजकीय भूमिका मांडत असाल तर सडेतोड उत्तर देऊ, अशा शब्दात आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांना ठणकावलं आहे.