अमरावती Lok Sabha Election : अमरावती लोकसभा मतदार संघात 4 जूनला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल हा मतमोजणीच्या एकूण 112 फेऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी लोकशाही भवन हे मतमोजणी केंद्र सज्ज झालं असून आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली.
विधानसभा मतदारसंघानुसार होतील मतमोजणीच्या फेऱ्या : अमरावती लोकसभा मतदारसंघात बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. बडनेरा मतदार संघातील 337 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहे. अमरावती मतदारसंघात 322 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या 18 फेऱ्या होतील. तिवसा मतदार संघातील 319 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. दर्यापूर मतदारसंघातील 342 मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार आहेत. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील 309 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाच्या एकूण 18 फेऱ्या घेतल्या जातील. मेळघाट विधानसभा मतदारसंघातील 309 मतदान केंद्रांवर झालेला मतदानाच्या एकूण मतमोजणीच्या वीस फेऱ्या होणार आहेत तर अचलपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 354 मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलीय.
मतमोजणी केंद्रावर किती असेल कर्मचाऱ्यांची संख्या : मतमोजणी करता मतदारसंघ निहाय 18 टेबलवर 18 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 18 मतमोजणी सहाय्यक तसंच 18 सूक्ष्मनिरीक्षक, 18 शिपाई याप्रमाणे एकूण सहा मतदारसंघाकरिता 108 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 108 मतमोजणी सहाय्यक, 108 सूक्ष्म निरीक्षक, 108 शिपाई याप्रमाणे 422 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीय. तसंच इतर कामाकरिता 500 कर्मचारी आणि 500 पोलीस कर्मचारी असे एकूण पंधराशे कर्मचारी नेमण्यात आल्याचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं.