मुंबई Amol Mitkari On Sharad Pawar : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. या टप्प्यात राज्यात 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2004 साली मुख्यमंत्री पदाचा दावा का सोडला, याबाबत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुलासा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय.
शरद पवारांचं प्रत्युत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अद्यापही मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला होता. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या प्रश्नाला उत्तर दिलंय.
काय म्हणाले शरद पवार : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्या नंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला का बहाल केलं, यावरुन त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केला. यावर शरद पवार म्हणाले की, 2004 साली मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडं देण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अजित पवार राजकारणात नवखे होते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जर मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्षात फूट पडली असती, म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देत पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदं घेतल्याचा खुलासाही शरद पवारांनी केलाय. सुप्रिया सुळेला सत्ता पद दिलं नाही. फक्त खासदारकी दिली. अजित पवार यांना कायमच सत्तापदं दिली. जनतेची कामं होत नाही, अशा प्रकारचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या मुद्द्याला देखील शरद पवारांनी खोडून काढलंय. 56 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आपण वीस वर्षे आपण सत्तेत होतो तरी देखील आपण राज्यात आणि केंद्रात आपलं स्थान निर्माण केलं असताना 2004 साली प्रफुल पटेल भाजपासोबत जाण्यास उत्सुक असल्याचाही दावा शरद पवार यांनी केलाय.
संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य : महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होतंय. शरद पवारांचं अशा वेळी अशा प्रकारचं एक-एक वक्तव्य येणं संशय निर्माण करणारं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार 1992 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडं बारा वर्षांची राजकीय परिपक्वता आहे. स्वतः शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळं मोजमाप काय लावलं. पवारांनी म्हटल्याप्रमाणे अजित पवार नवखे होते, मात्र अजित पवार त्यांच्यासोबतच होते. त्यामुळं त्यांच्याकडं अनुभवाचा प्रश्नच येत नाही. प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार ही खंत व्यक्त करण्यात आली की, 2004 साली काँग्रेस पेक्षा जास्त आमदार निवडून आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली संधी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं मुख्यमंत्री पद का नसावं, स्पेसिफिक मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडं नाही तर त्यावेळेस, आर आर पाटील, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर लोक पक्षात होते. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची ती संधी का गमावली, अजित पवार आपल्या स्वतःबद्दल बोलत नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलतात. मात्र शरद पवार यांनी त्यावर बोट ठेवत अजित पवारांकडं ती कुवत नव्हती, असं म्हटलं. ठीक आहे अजित पवार नवखे असतील. मात्र दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि आर आर पाटील यांना ही संधी का दिली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न. निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी शरद पवार अशा प्रकारचं वक्तव्य करुन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करताय का हे पहावं लागेल. 38 व्या वर्षी शरद पवार जर राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, तर अजित पवारांमध्ये असे कोणते गुण कमी होते की, ज्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली नसती, असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news
- उमेदवारांची शेवटच्या दिवशी प्रचारघाई... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं योग्य मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024