मुंबई Lok Sabha Election Result 2024 : उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत, न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका शिवसेना (ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर(Amol Kirtikar) यांनी घेतली आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत राष्ट्रपतींना पत्राद्वारे तक्रार करणार आहेत. येत्या काळात या निकालाचं प्रकरण चांगलच चिघळण्याची चिन्हे आहेत. कारण अमोल कीर्तिकर यांना आधी विजयी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला आहे.
नाट्यमयरित्या निकाल :मुंबईउत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नाट्यमयरित्या शिवसेना उमेदवार रविंद्र वायकर 48 मतांनी विजयी झाले आहेत. त्यापूर्वी मतमोजणीनंतर अमोल कीर्तिकर यांची 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. वायकर यांनी फेरमतांची मागणी केली. अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. परंतु, वायकर फेरमतमोजणीवर ठाम राहिले. यामध्ये 75 मतांनी वायकर आघाडीवर आले. तसंच पोस्टल मतांची फेरमोजणी केली. यात 111 मते बाद करण्यात आली. कीर्तिकर यांनी यावर हरकत घेतली. तसंच तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं व्हीव्हीपॅट मतांची फेरमोजणी करावी अशी मागणी केली. निवडणूक अधिकारी आणि सेनेच्या पोलिंग बूथच्या मोजणीत 652 मतांची तफावत आढळून आल्याचं म्हटलंय. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांकडं अधिकृत आकडेवारी असून सेनेच्या पोलिंग एजंटची मोजणी चुकीची आहे, असं सांगत वायकर 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली.