पिंपरी चिंचवड Ajit Pawar vs Vijay Shivtare : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय. त्यामुळं राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरचे शिवसेनाचे (एकनाथ शिंदे गट) माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. विजय शिवतारे हे अजित पवारांवर बेताल वक्तव्य करत असून त्यांनी अजित पवारांची माफी मागावी. अन्यथा आम्ही मावळसह संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीनं देण्यात आलाय. पिंपरी चिंचवड मधील खराळवाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे बोलत होते. त्यांनी हा इशारा दिलाय.
आम्ही युतीधर्म पाळतोय : यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले की, "विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. शिवतारे हे अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बेताल आणि शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. शिवतारे यांच्या विधानामुळं आम्ही नाराज आहोत. तसेच कार्यकर्ते संतप्त आहेत. आमच्या नेत्यांबाबत अतिशय चुकीची विधानं त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळं महायुतीला तडा जात आहे." तसंच महायुतीमध्ये राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पार्टी अजित पवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली आजपर्यंत तरी सहभागी आहोत. त्यामुळं महाराष्ट्रात महायुतीच्या लोकसभेत 45 जागा निवडून येण्यासाठी आम्ही युती धर्म पाळत आहोत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी बेताल वक्तव्य करुन युतीधर्म कुठं पाळत आहेत? असा सवाल गव्हाणे यांनी केला. तसंच भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी द्यावी, या मागणीवरदेखील आपण ठाम असल्याचं यावेळी गव्हाणे म्हणाले.