शिर्डी : विधानसभा निवडणुकीत झालेल्या परभवानंतर महाविकास आघाडीनं महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीनंही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं. आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. "एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे मध्यरात्री आपल्या परिवाराला घेवून देश सोडून जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी केली. पाठीत खंजीर खुपसला. केलेल्या पापाची शिक्षा उद्धव ठाकरेंना भोगावी लागेल," अशी टीका रामदास कदम यांनी केली.
EVM मशीनवर खापर फोडलं : "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या. त्यावेळी त्यांनी EVM मशीनवर खापर फोडलं नाही. आपल्या बाजूनं निकाल लागला की, मशीन चांगली आहे. निकाल नाही लागला की मशीनवर खापर फोडणं हे चुकीचं आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी EVM मशीनवर खापर फोडलं जात आहे," अशी टीका रामदास कदम यांनी महाविकास आघाडीवर शिर्डीत बोलताना केली.
महायुतीला चांगला कौल : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सहपरिवार शिर्डीत येवून साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना कदम म्हणाले की, "मागील अनेक वर्षांपासून मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतोय. नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सरकार राज्यात आलं आहे. साईबाबांनी महायुतीला चांगला कौल दिला असून, एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले, त्यामुळं जनतेनी मोठ्या संख्येनं महायुतीला मतदान केलं."
18-20 तास काम करणारे पहिले मुख्यमंत्री : "एकनाथ शिंदे यांनी रात्रंदिवस काम केलं. देशात अनेक मुख्यमंत्री असतील. मात्र, शिंदे हे 18-20 तास काम करणारे पहिले मुख्यमंत्री राहिले. मागच्यावेळी आमच्या जागा कमी असताना देखील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी दिली. आता भाजपाचे जास्त आमदार आहेत. आम्ही किती मागावे, काय मागावे याचं भान आम्ही ठेवलं पाहिजे. सर्वांची इच्छा आहे की, मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावेत. मात्र, भाजपालाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा जो काय निर्णय भाजपाचे वरिष्ठ घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल," असेही यावेळी रामदास कदम म्हणाले.
हेही वाचा -