मुंबई Devendra Fadnavis News :भारतीय जनता पार्टीत मुंबईतील काँग्रेसच्या दोन स्थानिक नेत्यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. वार्ड क्रमांक 82 चे काँग्रेसचे नगरसेवक जगदीश अमीन आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र नरवाडकर यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी एका मोठ्या प्रवाहात आम्हाला सामील व्हायचं होतं म्हणून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचं सांगितलं. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग आळवणी आणि प्रसाद लाड उपस्थित होते.
अनेक बडे नेते भाजपाच्या वाटेवर :यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. ते आमच्या संपर्कात आहेत. परंतु त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात अद्याप काहीही ठरलेलं नाही. योग्यवेळी आपल्याला कळवलं जाईल. परंतु ज्या नेत्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे आणि जे अजूनही चांगले नेते काँग्रेसमध्ये आहेत, अशा नेत्यांना निश्चितच भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला जाईल. बडे नेते लवकरच तुम्हाला भाजपामध्ये आलेले दिसतील", असं सूतोवाचही यावेळी त्यांनी केलं. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावर काहीही बोलण्यास फडणवीसांनी नकार दिला.