हैदराबाद World Health Day 2024 : दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जागतिक आरोग्याविषयी जागरुकता वाढवणे आणि लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. आजच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळं लोक कमी वयातच अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळं दरवर्षी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अनेक स्थानिक आरोग्य संस्था चर्चासत्र, नाटक, भाषणं इत्यादीद्वारे लोकांना निरोगी राहण्याचे महत्त्व समजावून सांगतात.
जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम काय आहे? :दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे एक विशेष थीम (World Health Day 2024 Theme) निश्चित केली जाते. त्याचबरोबर WHO ने यावर्षी 'माय हेल्थ माय राईट' ही थीम घेऊन जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. ही थीम हे दर्शवते की आरोग्य हा मानवी जीवनाचा खरा पाया आहे. तसंच कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य हा त्याचा हक्क आहे.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास :डिसेंबर 1945 मध्ये, ब्राझील आणि चीननं सर्वसमावेशक आणि स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर, जुलै 1946 मध्ये न्यूयॉर्कमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि 7 एप्रिल 1948 रोजी, 61 देशांनी एकत्र येऊन या एनजीओच्या स्थापनेसाठी करारावर स्वाक्षरी केली. हा दिवस पहिल्यांदा 22 जुलै 1949 रोजी साजरा करण्यात आला होता, परंतु नंतर ही तारीख बदलून 7 एप्रिल करण्यात आली, त्याच तारखेला जेव्हा WHO अधिकृतपणे स्थापन करण्यात आले होते. म्हणून, 1950 मध्ये, हा दिवस प्रथमच अधिकृतपणे साजरा करण्यात आला.
WHO चा संदेश : WHO दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाच्या प्रादेशिक संचालक सायमा वाजेद म्हणाल्या की, "देशातील जवळपास 40 टक्के लोक अशी आहेत, ज्यांना आरोग्य सेवांची माहिती मिळत नाही. त्यामुळं यासर्व लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, मधुमेह आणि तीव्र श्वसनरोग - या चार प्रमुख आजारांमुळं 30 ते 70 वर्षे वयोगटातील मृत्यूची संभाव्यता अजूनही 21.6 टक्क्यांवर अस्वीकार्यपणे उच्च आहे. तसंच बऱ्याच जणांना अजूनही टीबी, एचआयव्ही/एड्स, अपंगत्व किंवा मानसिक आजार यासारख्या विशिष्ट आरोग्यविषयक परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यांच्या लिंग, वर्ग, वांशिकता, धर्म, लैंगिक प्रवृत्ती किंवा इतर वैशिष्ट्यांवर आधारित त्यांना आरोग्य व्यवस्थेत भेदभावाचा सामना करावा लागतो."
हेही वाचा-
- रिझर्व बँक गव्हर्नर शक्तीकांत दास यांची 'महागाईचा हत्ती' कथा आणि देशातील महागाईचे वास्तव - inflation in India
- सेमीकंडक्टरची 'महासत्ता' बनेल भारत! चीनशी होईल काटे की टक्कर - Indian Semiconductor Industry
- मानसिक आजाराने ग्रस्त लोकांना मरणाची परवानगी द्यावी का? वाचा सविस्तर - Euthanasia