नवी दिल्ली T20 World Cup Pitches : अमेरिकेत प्रथमच ICC T20 विश्वचषक 2 जूनपासून सुरू होणार आहे. याआधी अमेरिकेत ना क्रिकेट स्टेडियम होतं ना खेळपट्टी बनवणारे क्युरेटर. मात्र, आता अमेरिकेत देखील विश्वचषकाचा थरार बघायला मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्यांना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी 17 हजार 171 किमी अंतर पार करावं लागलं आहे.
T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी तयार :विश्वचषकासाठी खेळपट्ट्या ॲडलेडमध्ये तयार करण्यात आल्या. त्यानंतर खेळपट्ट्यांना परिपक्व होण्यासाठी फ्लोरिडाला नेण्यात आलं. शेवटी लाँग आयलंड, न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमच्या मध्यभागी खेळपट्ट्यांना स्थापित करण्यात आलं आहे. या खेळपट्ट्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. या खेळपट्ट्या डॅमियन हॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या आहेत. यासाठी डॅमियन हॉफ यांना फारचं कष्ट घ्यावे लागले. त्यांच्या अथक परिश्रमानंतर T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी तयार झाली. तत्पूर्वी, ICC अधिकाऱ्यांनी हॉफ यांच्याशी संपर्क साधला त्यांना T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी तयार करण्याची विनंती केली होती.
डेमियन हॉफ कोण आहेत :पाच वर्षांपूर्वी हॉफ यांनी त्यांच्या प्रवासाला सुरवात केली होती. त्यांनी ॲडलेड ओव्हलमध्ये काही स्थानिक क्रीडा संस्थांसोबत काम केल्यामुळं त्यांना खेळपट्टी तयार करण्याचं कौशल्यं प्राप्त झालं. त्यानंतर त्यांची 2024च्या T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी क्युरेटर म्हणून निवड झाली. युएस-आधारित स्पोर्ट्स टर्फ कंपनी, लँडटेकसोबत करार करून त्यांनी क्रिकेट स्टेडियमचा करार केला. खेळपट्टी तयार करण्याच्या प्रक्रियेत नाविन्यपूर्ण डिझाइन, आधुनिक बांधकाम, क्रिकेट खेळपट्टी तयार करण्यासाठी एक प्रगत दृष्टीकोन लागतो. त्यासाठी हॉफ यांनी मेहनत घेत पारंपरिक खेळपट्ट्या तसंच अत्याधुनिक खेळपट्ट्यांच्या बांधकामाचा समन्वय साधला.