न्यायासाठी विलंब म्हणजे न्याय नाकारणे असं म्हणतात. यातून असं सूचित होतं की जेव्हा कायदेशीर निकाल त्वरित दिला जात नाही तेव्हा ते न्याय न देण्यासारखंच असतं. न्यायासाठी विलंब, विशेषतः गंभीर गुन्हेगारी आणि दिवाणी प्रकरणांमध्ये, पीडितांचे दुःख वाढवतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे, राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड (एनजेडीजी) नुसार, २० जानेवारी २०२५ पर्यंत, भारतातील उच्च न्यायालयांसमोर १६ लाख गुन्हेगारी प्रकरणांसह ६२ लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रलंबित आहेत.
वाढत्या प्रलंबित गुन्हेगारी अपिलांना निकाला काढसाठी, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांमध्ये तात्पुरत्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या अटी शिथिल केल्या. "प्रत्येक उच्च न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम २२४अ चा आधार घेऊन तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती करू शकते. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीच्या एमओपीचा परिच्छेद २४ कलम २२४ अंतर्गत प्रक्रियेशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (सेकंड जज केस) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार १९९८ मध्ये एमओपी तयार करण्यात आला होता. न्यायाधीशांची नियुक्ती मंजूर संख्येच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. तात्पुरत्या न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात बसतील आणि प्रलंबित फौजदारी अपीलांवर निर्णय देतील. तात्पुरते न्यायाधीश म्हणजे निवृत्त न्यायाधीश ज्यांची नियुक्ती विशिष्ट रिक्त पदासाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी तात्पुरत्या आधारावर केली जाते. अशा न्यायाधीशांना नियमित न्यायाधीशांसारखेच अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेषाधिकार असतील परंतु त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश मानले जाणार नाही.
तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या सहभागाशिवाय केली जाते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवृत्त न्यायाधीशांची संमती घेतात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळवतात. त्यांची नावं राज्यपालांना पाठवतात. राज्यपाल ते केंद्रीय कायदा मंत्री यांना पाठवतात, ते त्यावर सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात आणि मंजुरी मिळाल्यावर, राज्याचे मुख्यमंत्री नियुक्तीचे अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी करतात. अशा न्यायाधीशांचा कार्यकाळ सामान्यतः दोन ते तीन वर्षांचा असतो.
तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी एकच कारण पुरेसे नसते इतरही काही विशिष्ट परिस्थितीत अशा नियुक्ती करण्यात येतात. त्यामध्ये जर रिक्त पदे मंजूर संख्येच्या २०% पेक्षा जास्त असतील, एका श्रेणीतील प्रकरणे पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित राहतील, प्रलंबित असलेल्या १०% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये पाच वर्षांहून अधिक जुनी प्रकरणे असतील, निकालाचा दर विशिष्ट विषयातील किंवा एकूण प्रकरणांपेक्षा कमी असेल किंवा एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने कमी निकालाचा दर असल्याने वाढत्या थकित प्रकरणांची संख्या जास्त असेल, अशा कारणांचा समावेश असू शकतो.