हैद्राबादRed Sea Crisis: इस्रायल तसंच हमास यांच्यातील युद्धामुळं उद्भवलेल्या उद्रेकाचा फायदा घेत व्यापारी जहाजांवर हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. एडनच्या आखात तसंच लाल समुद्राच्या प्रदेशात व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोर, सोमालियन चाच्यांकडून लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
2018 पासून, 2023 च्या उत्तरार्धापर्यंत समुद्री चाच्यांच्या हालचाली कमी झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र, समुद्री चाच्यांनी पुन्हा एकदा जहाजांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळं यूएस तसंच इतर युरोपियन युनियन देश लाल समुद्रातील हुथी बंडखोरांचा सामना करण्यासाठी 'ऑपरेशन समृद्धी संरक्षक', 'ऑपरेशन एस्पाइड्स'मध्ये व्यग्र आहेत. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर चाचेगिरीचं पुनरुत्थान झालं आहे. सोमालियाच्या जवळ बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय नौदल शिपिंग लेनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. भारतीय नौदलाला चाचेगिरीविरोधी कारवायांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळं भारतीय नौदलानं व्यापारी शिपिंगला सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी घेतली आहे.
भारत आता लाल समुद्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत 2008 पासून या प्रदेशात नजर ठेवतोय. तसंच अमेरिका, फ्रान्स, चीन हे देश देखील जहाजांवरील हल्ल्याविरुद्ध कारवाया करत आहेत. 2008 पासून भारतीय नौदलानं एडनच्या आखातात तसंच आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर 'अँटीपायरेसी' गस्त वाढवली आहे. यासाठी सुमारे 106 जहाजांचा वापर करण्यात आला आहे. यात भारतीय नौदलानं 3 हजार 440 जहाजं 25 हजारांहून अधिक खलाशांना यशस्वीरित्या बाहेर काढलं आहे.
जून 2019 मध्ये ओमानच्या आखातातील व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, भारतीय नौदलानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी पर्शियन गल्फ तसंच ओमानच्या आखातामध्ये 'ऑपरेशन संकल्प' सुरू केलंय. लाल समुद्रात सुरू असलेल्या संकटाच्या दरम्यान, भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्समध्ये सामील झालेला नाही. परंतु वाढत्या लाल समुद्रातील चाचेगिरीचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलानं जिबूती, एडनचं आखात तसंच सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील उत्तर, मध्य अरबी समुद्र यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये युद्धनौका तैनात केल्या आहेत.
लाल समुद्रात हुथींचा मुकाबला करण्याऐवजी, भारतीय नौदलानं प्रामुख्यानं एडनच्या आखात, अरबी समुद्रात वाढलेल्या चाचेगिरीचा सामना करण्यासाठी क्षेपणास्त्र नाशक, लांब पल्ल्याच्या पाळत ठेवणारी सागरी विमानं, डॉर्नियर विमानांसह १२ युद्धनौका तैनात केल्या आहेत. प्रीडेटर MQ9B ड्रोन, खास कमांडो अरबी समुद्रात सुमारे चार दशलक्ष चौरस किलोमीटर (1.5 दशलक्ष चौरस मैल) व्यावसायिक शिपिंगचं निरीक्षण करण्यासाठी भारतीय नौदलानं पावलं उचलली आहेत.
आयएनएस कोलकाता, आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस कोची, आयएनएस चेन्नई, आयएनएस मुरमुगाव, तलवार श्रेणीतील फ्रिगेट्स क्षेपणास्त्र, नौका यांचा यात समावेश आहे. तसंच टास्क ग्रुप तैनात करण्यात आले आहेत. दोन आत्याधुनिक जहाजं एडनच्या आखातात तैनात करण्यात आली होती. उर्वरित 10 जहाजं उत्तर, पश्चिम अरबी समुद्रात तैनात करण्यात आली आहेत. किमान चार युद्धनौका ब्रह्मोस, जमिनीवर हल्ला करणारी क्षेपणास्त्रं, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं, पाणबुडीविरोधी युद्ध-सक्षम हेलिकॉप्टर, सी गार्डियन ड्रोन, पाळत ठेवण्यासाठी P8I विमानांनी सज्ज ठेवण्यात आलं आहे.
या प्रदेशात तैनात असलेल्या भारतीय नौदलानं गेल्या दोन महिन्यांत 250 हून अधिक जहाजं, लहान बोटींवर देखरेख तसंच त्यांची तपासणी केली आहे. तसंच 40 हून अधिक जहाजांवर करण्यात आलेल्या हल्ल्याला प्रतिसाद दिला आहे. UNCLOS द्वारे डिसेंबर 2023 पासून या प्रदेशात अनेक व्यापारी जहाजांच्या हल्ल्यांना भारतीय नौदलानं प्रत्यूत्तर दिलंय. समुद्री चाच्यांची जहाजं जप्त करण्यासाठी तसंच व्यक्तींना अटक करण्यासाठी (अनुच्छेद 105), (अनुच्छेद 110) तसंच, भारताचा 2022 चा सागरी चाचेगिरी विरोधी UNCLOS कायद्याद्वारे कारवाया केल्या आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये रुएन व्यापारी जहाजे; एमव्ही केम प्लूटो; MV साई बाबा, जानेवारी 2024 मध्ये MV लिला नॉरफोक; एफव्ही इमान; एफव्ही अल नईमी; एमव्ही जेन्को पिकार्डी; MV Marlin Launda, मार्च MSC Sky II, MV अब्दुल्ला या व्यावसायिक जहाजांवर चाच्यांनी हल्ले केले होते. त्यांना वाचण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली होती. तथापि, सोमालियाच्या किनाऱ्यावरील चाच्यांपासून माजी एमव्ही रुएन या व्यावसायिक जहाजाची सुटका करण्यासाठी भारतीय नौदलानं केलेल्या ऑपरेशननं आपली उत्कृष्ट संरक्षण क्षमता प्रदर्शित केली होती.