वॉशिंग्टन :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पार्टीच्या नेत्या तथा उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या मैदानात आहेत. तर रिपब्लिकन पार्टीकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी मैदानात उतरले आहेत. कमला हॅरिस यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी मिनेसोटाचे गवर्नर टिम वाल्ज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जेडी वेंस हे आहेत. विशेष म्हणजे जेडी वेंस यांनी एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांना हिटलर म्हणून संबोधलं होतं. मात्र या निवडणुकीत ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर उपराष्ट्रध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहेत.
कोण होणार अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आज मतदान होणार आहे. अमेरिकेत होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेमुळे तगडी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पार्टीकडून विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 21 जुलैला आपण राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर केवळ साडेतीन महिन्याच्या कालावधीत कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची तयारी केली आहे. तर दुसरीकडं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मागील वेळीच त्यांनी आपण व्हाईट हाऊस सोडायला नको होते, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यास या पदावर दुसऱ्यांदा बसणारे ते पहिले व्यक्ती होतील. तर कमला हॅरिस यांनी निवडणूक जिंकल्यास अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासातील त्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्यामुळे यावेळी अमेरिकेत होत असलेली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक मोठी रंजक ठरणार आहे.