नवी दिल्ली PM Modi in UAE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी इथं पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं आहे. यावेळी उपस्थित अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वेळातील क्षण अन् क्षण आणि शरीरातील कण न् कण भारत मातेसाठी आहे, असं स्पष्ट केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसंच भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवेल, असा आशावाद व्यक्त केला.
पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी इथं पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं. अबुधाबीत बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (BAPS) वतीनं हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी " अयोध्येतील राम मंदिरानंतर आज मी अबुधाबीतील मंदिराचं उद्घाटन केलं. माझ्या मित्रांनी मी मंदिराचा सर्वात मोठा पुजारी असल्याचं म्हटलं आहे. मी मंदिराचा पुजारी होण्याची माझी पात्रता आहे का, हे माहिती नाही. मात्र मी भारत मातेचा सर्वात मोठा पुजारी आहे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.