देर अल-बालाह (गाझा पट्टी) :इस्रायलनं पुन्हा एकदा आक्रमकपणे गाझा पट्ट्यात हल्ले सुरू केले आहेत. रविवारी पहाटे मध्य गाझामध्ये (Israeli Airstrike On Gaza Mosque) इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर अल अक्सा रुग्णालयानं दिलेल्या निवेदनात देर अल-बालाह शहरातील रुग्णालयाजवळील प्रार्थनास्थळाजवळ आश्रय घेत असलेल्या स्थलांतरित लोकांवर हल्ला करण्यात आल्याचं सांगितलंय.
गाझाप्रार्थनास्थळावर हल्ला : रुग्णालयाच्या नोंदीवरुन असं दिसून आलंय की, मृत्यू झालेले सर्व पुरुष होते. तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. प्रार्थनास्थळावरील हल्ल्याबाबत इस्रायली सैन्यानं अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमुळं गाझामधील पॅलेस्टिनी लोकांचा मृतांचा आकडा आता 42,000 च्या जवळ पोहोचला आहे. यापैकी किती सामान्य नागरिक आणि किती दहशतवादी होते, याविषयी अद्याप मंत्रालयानं कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.