तेहारन Gunmen kill nine Pakistanis : इराण आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढल्याचं दिसतंय. कारण आग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी 9 जणांची हत्या केली होती. या मृतांची ओळख पाकिस्तानी असल्याचं वृत्त इराणच्या माध्यमांनी दिलंय. इराणच्या माध्यमांनी वृत्त दिलंय की, " प्रत्यक्ष साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी अज्ञात सशस्त्र लोकांनी सिस्तान-बलुचेस्तान प्रांतातील सरवान शहरातील सिरकान परिसरात एका घरात नऊ विदेशा नागरिकांची हत्या केली."
कोणत्याही संघटनेनं घेतली नाही हत्येची जबाबदारी : स्थानिक माध्यमांनी सांगितलं की, अद्याप कोणत्याही संघटनेनं या हत्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तेहरानमधील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद मुदस्सीर टिपू यांनी 'एक्स' या मीडियावर म्हटलंय की, “सरवानमध्ये 9 पाकिस्तानींच्या भीषण हत्येमुळं मला खूप धक्का बसलाय. दुतावास शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण मदत करेल. आम्ही इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलंय.” पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी हा हल्लाचा 'भयानक आणि घृणास्पद' म्हणून निषेध केला. तसंच इराणी अधिकाऱ्यांना "या घटनेची चौकशी करुन या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन केलंय."
- लवकर मृतदेह परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : इराणमधील पाकिस्तानी दूतावास लवकरात लवकर मृतदेह परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. इस्रायल-हमास युद्धामुळं आधीच प्रादेशिक तणाव वाढलेल्या बलुचिस्तानच्या खुल्या सीमा प्रदेशात दुर्मिळ लष्करी कारवाईनंतर हा प्राणघातक हल्ला झालाय.