Lok Sabha Elections 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता फक्त भारतामध्येच नाही तर इतर देशामध्येदेखील आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी हुसैन यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलंय. "नरेंद्र मोदींनी ही निवडणूक पराभूत व्हावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे," असं त्यांनी म्हटलं. यासोबतच त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही पाठिंबा दिलाय. फवाद चौधरी यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
फवाद चौधरी हुसैन काय म्हणाले? : पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी हुसैन अनेकदा भारताच्या राजकारणावर प्रतिक्रिया देत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाची चर्चा होत आहे. फवाद चौधरी म्हणाले की,''काश्मीर असो किंवा उर्वरित भारत, मुस्लिमांना सध्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करावा लागतोय. या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होणं महत्त्वाचं आहे. तसेच नरेंद्र मोदींनी निवडणूक हरली पाहिजे, अशी पाकिस्तानी जनतेची इच्छा आहे. हा कट्टरतावाद पाकिस्तानातही आणि भारतातही कमी होईल. तेव्हाच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारतील,'' अशी प्रतिक्रिया फवाद चौधरी हुसैन यांनी दिलीय.
भाजप मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करत आहे :फवाद चौधरी पुढे म्हणाले की, "मला वाटते भारतातील मतदार मूर्ख नाहीत. याचा फायदा भारतीय मतदारांना होईल. पाकिस्तानशी संबंध सुधारावेत आणि भारतानं प्रगतीशील देश म्हणून पुढे जावं. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कट्टर विचारसरणीचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे. राहुल गांधी असो, अरविंद केजरीवाल असो वा ममता बॅनर्जी, जो कोणी त्यांचा पराभव करेल त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पाकिस्तानमध्ये भारताविषयी द्वेष नाही. पण, आरएसएस आणि भाजपची युती आहे. ते पाकिस्तानबद्दल आणि मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. या विचारसरणीच्या लोकांना पराभूत करणं हे आपलं कर्तव्य आहे." त्यांच्या वक्तव्याची चर्चा पाकिस्तानासह भारतामध्ये देखील होत आहे.
भाजपचा पराभव करेल तो जगात सन्मान मिळवेल : फवाद चौधरी पुढे बोलताना म्हणाले, ''पाकिस्तानच्या संस्थापकांनी भारतात राहणाऱ्या मुस्लिमांच्या हक्कांसाठी ठामपणं उभ राहण्याचं वचन दिलं होतं. पण पाकिस्तान सरकार आपली भूमिका बजावत नाही, हे दुर्दैव आहे. पण मी कोणत्याही परिस्थितीत भारतात मुस्लिमांच्या हक्कांसाठी बोलेन. कारण तिथे पसरलेल्या मुस्लिमांविरुद्धच्या द्वेषाचा पराभव व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पराभूत व्हावं लागेल. जो कोणी त्यांचा पराभव करेल तो जगात सन्मान मिळवेल.
- "तुमच्या देशातील अत्यंत वाईट स्थितीकडं लक्ष द्या. आम्ही सक्षम आहोत, असे नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत फवाद चौधरी यांना सांगितलं होतं. तरीही फवाद यांच्या विधानानंतर पुन्हा राजकीय वातावरण तापणार आहे.
हेही वाचा