ओटावा : सीरियात मागील अनेक वर्षापासून बशर अल असद याची हुकूमशाही राजवट कार्यरत होती. मात्र बंडखोरांनी उभारलेल्या लढ्याला यश आलं असून बशर अल असद या हुकूमशहाला सीरियातून पळवून लावलं आहे. बशर अल असदची हुकूमशाही बंडखोरांनी उलथवून टाकल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी मोठं भाष्य केलं आहे. बशर अल असदच्या हुकूमशाही पतनानं अनेक वर्षापासून सुरु असलेल्या क्रूर दडपशाहीचा अंत झाला, असं त्यांनी आपल्या सोशल माध्यमांवर स्पष्ट केलं.
बशर अल असदच्या हुकूमशाहीचं पतन :सीरियातील बंडखोरांनी रविवारी दमास्कसमध्ये प्रवेश केल्यानंतर जगभराचं लक्ष या घडामोडींवर लागलं होतं. अखेर बंडखोरांनी सीरियातील हुकूमशहा बशर अल असद याची हुकूमशाही उलथवून टाकली. बशर अल असद याला सीरियाच्या सैन्यानं दमास्कसमधून बाहेर काढलं. त्यानंतर बशर अल असदनं अज्ञात ठिकाणी पळ काढला. सध्या बशर अल असद यानं कुठं मुक्काम हलवला याबाबतची माहिती उघड झाली नाही. दुसरीकडं सीरियाचे पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी एक व्हिडिओ प्रसारित करुन आपण सीरियातचं राहणार असून बंडखोर ज्याला सत्तेवर बसवतील, त्यांच्यासोबत काम करणार असल्याचं स्पष्ट केलं.