नवी दिल्ली Elon Musk : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताच्या स्थायी सदस्यत्वाचं जोरदार समर्थन केलं आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असूनही, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नसणं निव्वळ मूर्खपणा आहे, असं इलॉन मस्क म्हणाले. यासह त्यांनी UNSC मध्ये संपूर्ण आफ्रिका खंडाच्या एकत्र स्थायी सदस्यत्वाचीही वकिली केली आहे.
भारत स्थायी सदस्य नसणं मूर्खपणा : "आता संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. मात्र समस्या अशी आहे की, ज्या देशांकडे जास्त शक्ती आहे ते आपली जागा सोडू इच्छित नाहीत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही, भारत UNSC चा स्थायी सदस्य नसणं हा मूर्खपणा आहे. तसंच आफ्रिकेलाही एकत्रितपणे स्थान मिळायला हवं", असं मस्क म्हणाले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) म्हणजे काय : सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे, जी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी काम करते. यात 15 सदस्य देश आहेत. ज्यामध्ये पाच स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स आणि रशिया यांचा समावेश आहे. या 5 देशांना 'व्हेटो पॉवर' असतो. व्हेटो पॉवर म्हणजे 'नकाराधिकार'. संयुक्त राष्ट्रात आलेल्या कोणत्याही प्रस्तावाला या पाचपेकी एका जरी सदस्य देशानं विरोध केला, तर तो प्रस्ताव पास होऊ शकत नाही.
भारत अस्थायी सदस्य : सर्वसाधारण सभेचे 10 अस्थायी सदस्य दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. भारत सध्या संघटनेचा अस्थायी सदस्य आहे. भारतानं या आधी अनेकवेळा UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी आपला दावा मांडलाय. अमेरिकाचा याला पाठिंबा असून, चीन मात्र भारताच्या या दाव्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आता मस्क यांनी भारताची वकिली केल्यानं पुन्हा या विषयाला गती मिळण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :
- राम मंदिरावरून पाकिस्तानचा जळजळाट; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा केला निषेध