वॉशिंग्टन : जगभरातील देश चीनी सायबर हल्लेखोरांमुळे त्रस्त आहेत. या हल्लेखोरांनी आता थेट जगभरात महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या तिजोरीला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी चीन-अमेरिकेमध्ये नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
चीन सरकारचा पाठिंबा असलेल्या चीनच्या सायबर हल्लेखोरानं अमेरिकेच्या कोषागार कार्यालयाला ( यूएस ट्रेझरी) लक्ष्य केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन सरकार प्रायोजित या सायबर हल्ल्यात अमेरिकेच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या काळात सायबर हल्लेखोरानं अनेक महत्त्वाची कागदपत्रे बेकायदेशीरपणे मिळविली आहेत. या हल्ल्यात किती नुकसान झाले, याची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. अमेरिकेच्या कोषागार विभागानं अमेरिकेच्या संसद प्रतिनिधींना सायबर हल्ल्याची माहिती दिली आहे. या धक्कादायक हल्ल्याची एफबीआय आणि इतर एजन्सी संयुक्तपणे चौकशी करत आहेत. अहवालानुसार, या सायबर हल्ल्याची माहिती 8 डिसेंबर रोजी एका थर्ड पार्टी सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडरनं दिली होती.
अदिती हर्डीकर यांनी काय म्हटले?यूएस ट्रेझरीच्या सहाय्यक सचिव अदिती हर्डीकर यांनी या संदर्भात एका पत्रात म्हटलंआहे, उपलब्ध संकेतांच्या आधारे हा हल्ला चीनी सरकार प्रायोजित पर्सिस्टंट धोका (एपीटी) मानण्यात येत आहे. यूएस ट्रेझरी प्रवक्त्यानं सांगितलं की, ज्या ठिकाणी सायबर नियमांचे उल्लंघन झाले, ती सेवा ऑफलाइन घेण्यात आली आहे. कायद्याची अंमलबजावणी आणि सायबर सुरक्षा आणि पायाभूत सुरक्षा एजन्सी (CISA) यांच्या समन्वयानं पावले उचलली जात आहेत. सायबर हल्लेखोरानं ट्रेझरी सिस्टम किंवा माहितीमध्ये प्रवेश चालू ठेवला आहे, असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. या हल्ल्याचं विश्लेषण करण्यासाठी ट्रेझरी अधिकारी पुढील आठवड्यात हाऊस फायनान्शियल सर्व्हिसेस कमिटीसोबत गोपनीय माहिती घेण्याचा विचार करत आहे. मात्र, ब्रीफिंग करण्याबाबत नेमकी वेळ अद्याप ठरलेली नाही.
दक्षिण कोरियावरदेखील केला होता हल्ला-चीनी सायबर हल्लेखोर जगातील अनेक देशांमध्ये सरकारी, शैक्षणिक आणि गैर-सरकारी संस्थांच्या वेबसाइट्स हॅक करून डाटा चोरतात. चीनी सायबर हल्लेखोरांनी जानेवारी 2024 मध्ये दक्षिण कोरियाच्या 12 शैक्षणिक संस्थांवर सायबर हल्ला केला होता. यामध्ये जेजू विद्यापीठ आणि कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनच्या काही विभागांसह 12 संस्थांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा-
- सावधान! सायबर गुन्हेगारांनी 75 वर्षीय वृद्धाला घातला तब्बल 11 कोटी रुपयांचा गंडा
- सायबर फसवणूक प्रकणात पोलिसांना मोठं यश, 84 वर्षीय वृद्धाला 53 लाख रुपये दिले परत