लंडनUK Election : ब्रिटनमधील सरकार निवडण्यासाठी (हाऊस ऑफ कॉमन्स ) गुरुवार 4 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. यावेळी यूकेच्या 650 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांवर सकाळी 7:00 ते रात्री 10:00 दरम्यान मतदान होईल. काही नागरिकांनी अगोदरच पोस्टल मतदानाचा पर्याय निवडला आहे. "फर्स्ट पास्ट द पोस्ट" प्रणाली अंतर्गत, प्रत्येक मतदारसंघात सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार त्या मतदारसंघाचा खासदार होणार आहे. 4 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष गेल्या 14 वर्षापासून ब्रिटनमध्ये सत्तेत आहे. गेल्या चौदा वर्षात त्यांच्या पाच वेगवेगळ्या पंतप्रधानांनी देशाचं नेतृत्व केलय. मात्र, यावेळी ब्रिटनमधील परिस्थिती वेगळी आहे. कारण ऋषी सुनक यांचा पक्ष मुख्य विरोधी पक्ष लेबर पक्षाकडून पराभूत होण्याची शक्यता आहे. यूकेच्या "फर्स्ट पास्ट द पोस्ट" निवडणूक प्रणाली अंतर्गत ब्रिटीश राजकारणावर परंपरावादी नेत्यांचं जास्त वर्चस्व आहे. त्यामुळं लहान पक्षांना संसदेत प्रतिनिधित्व मिळत नसल्याचं दिसून येत आहे. परंतु लिबरल डेमोक्रॅट्स, रिफॉर्म यूके, स्कॉटिश नॅशनल पार्टी तसंच ग्रीन्स हे इतर पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कंझर्वेटिव्ह पक्ष :भारतीय वारसा असलेल्या सुनक यांना यूकेचं पहिले ब्रिटिश आशियाई तसंच हिंदू पंतप्रधान होण्याचा मान मिळाला. ट्रस आणि बोरिस जॉन्सन प्रशासनाच्या गोंधळानंतर सरकारमध्ये स्थिरता आणल्याबद्दल तसंच महागाई कमी केल्याबद्दल सुनक यांची त्यावेळी चर्चा होती. कंझर्व्हेटिव्ह पक्ष तसंच लिझ ट्रस यांच्या अल्पकालीन पंतप्रधानपदानंतर अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा घेऊन, 44 वर्षीय सुनक ऑक्टोबर 2022 मध्ये सत्तेवर आले होते. ते ब्रिटनचे पंतप्रधान होणारे पहिले हिंदू नेते आहेत. सत्तेत आल्यानंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था स्थिर केल्याचा दावा सुनक यांनी केला आहे. मात्र, त्याच्याकडं राजकीय निर्णयाचा अभाव असून ते सामान्य मतदारांच्या संपर्कात नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. सुनक यांनी लिझ ट्रस यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. लिझ ट्रस यांना केवळ 49 दिवसांत कर-कपातीच्या आर्थिक धोरणांमुळं पक्षाचा पाठिंबा गमवावा लागला होता.
कंझर्वेटिव्ह पक्षाची काय आहेत आश्वासने : या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंझर्वेटिव्ह पक्षानं महागाई, सार्वजनिक आरोग्य, संरक्षण खर्चात वाढ, ब्रिटनचा जीडीपी 2.5% वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासोबत देशाला मजबूत अर्थव्यवस्था करण्याचं त्यांच्या पक्षाचं लक्ष्य असल्याचं सुनक यांच्या पक्षाचं म्हणणं आहे. याशिवाय कर चुकवेगिरी, आश्रय-शोधकांना रवांडामध्ये पाठवण्याचं मतदारांना वचन दिलं आहे.
मजूर पक्ष :आगामी निवडणुकीत मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांना पंतप्रधानपदी सर्वाधिक पसंती मिळतेय. त्यांनी या आगोदर मानवाधिकार महाधिवक्ता, सरकारी वकील म्हणूक काम केलं आहे. त्यांना ब्रिटनमध्ये यावेळी सर्वाधिक मतदारांनी पसंती दिली आहे. आगामी निवडणुकीच्या विजयानंतर ते पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. एप्रिल 2020 मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. स्टारमर यांनी त्यांच्या पक्षातील सेमिटिझमची पाळेमुळं उखडून टाकल्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
मजूर पक्षाची आश्वासनं :10 वर्षांच्या पायाभूत सुविधा धोरणांतर्गत "संपत्ती निर्मिती", गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, ब्रिटनच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, ऊर्जा सुरक्षिततेला चालना देणे, सरकारी मालकीच्या ऊर्जा कंपनीची स्थापना करणे, नवीन शिक्षक भरती, खासगी शाळांवर कर इत्यादी अश्वासनं मजूर पक्षानं मतदारांना दिली आहेत.
लिबरल डेमोक्रॅट्स पक्ष : लिबरल डेमोक्रॅट्स पक्षाचे नेते एड डेव्ही पहिल्यांदा 1997 मध्ये संसदेत निवडून आले होती. ते माजी अर्थशास्त्र संशोधक आहेत. त्यांनी 2012 ते 2015 पर्यंत कंझर्व्हेटिव्ह-लिबरल डेमोक्रॅट युती अंतर्गत सरकारचे ऊर्जा आणि हवामान बदल सचिव म्हणून काम केलंय.