मुंबई Zika Virus in Maharashtra : महाराष्ट्रात झिका विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, केंद्र सरकारने सर्व राज्यांना एक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात दक्षतेची गरज असल्याचं सांगितलं आहे. पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. संसर्गासाठी गर्भवती महिलांच्या तपासणीद्वारे राज्यांना सतत जागरुक ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
- काय आहे ॲडव्हायझरी : महाराष्ट्रातील झिका विषाणूची काही नोंदवलेली प्रकरणे पाहता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी राज्यांना सतत दक्ष राहण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
राज्यांना दिला सल्ला : झिका हा गर्भवती महिलेच्या गर्भातील मायक्रोसेफली आणि न्यूरोलॉजिकल परिणामांशी संबंधित आहे. त्यामुळं राज्यांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी डॉक्टरांना सतर्क करावे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करण्यासाठी, झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारनं निर्देश दिले आहेत.
- महाराष्ट्रातील प्रकरणे : 3 जुलैपर्यंत महाराष्ट्रात 9 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात पुण्यातील 7 आणि कोल्हापूर आणि संगमनेरमधील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे.
- झिका विषाणू काय आहे : झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारखा एडिस डासातून पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा एक घातक नसलेला आजार आहे. तरी, झिका प्रभावित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये मायक्रोसेफलीशी (डोक्याचा आकार कमी) संबंधित आहे. त्यामुळं ही एक मोठी चिंता आहे.
झिका विषाणूचा इतिहास :झिका विषाणूचा प्रसार वाढल्यानं मायक्रोसेफली आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या घटनांमध्ये वाढ झालीय. युगांडामध्ये 1947 मध्ये माकडांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला. झिकानंतर 1952 मध्ये मानवांमध्ये आढळला. झिका संसर्गामुळं झालेल्या रोगाचा पहिला मोठा उद्रेक 2007 मध्ये याप बेटावर नोंदविण्यात आला. सध्या अनेक देश झिका विषाणूचा प्रादुर्भावाच्या संकटातून जात आहेत.
- भारतातील झिका विषाणूचा इतिहास : नोव्हेंबर २०१६ मध्ये, अहमदाबाद, गुजरात विषाणू संशोधन निदान प्रयोगशाळेद्वारे झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला.
- लस नाही: झिका विषाणू संसर्ग प्रतिबंध किंवा उपचारासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.
झिकाचा असा होतो प्रसार :
- झिका विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून लैंगिकरित्या संक्रमित होऊ शकतो.
- झिका विषाणूच्या संसर्गाबद्दल संबंधित लैंगिक भागीदारांचे संरक्षण करण्यासाठी कंडोमचा वापर करावा.
- झिका विषाणू इतर शारीरिक द्रवांपेक्षा वीर्यमध्ये जास्त काळ टिकून राहतो.