Aloe Vera Gel Benefits For Skin:त्वचेचं सौंदर्य टिकून रहावं यासाठी बाजारात अनेक सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध आहेत. मात्र, ते रासायनिक घटकांपासून तयार होत असल्यामुळे त्वचेसाठी अपायकारक ठरू शकतात. त्या ऐवजी घरगुती साधनं आणि वनस्पतिंचा उपयोग करण्याचा सल्ला अनेक ब्युटिशियन देतात. त्या साधनांपैकी त्वचा टवटवीत ठेवणाऱ्या एका वनस्पती बाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तेलकट, कोरडी आणि संवेदनशील त्वचेवर ब्युटी प्रोडक्ट्सचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. मात्र, कोरफड या वनस्पतीचा गर अशा त्वचेला फायद्याचा ठरू शकते. त्याचा वापर जाणून घेऊया.
चमकणाऱ्या चेहऱ्यासाठी : चमकणाऱ्या चेहऱ्यासाठी चिमूटभर हळद, एक चमचा दूध, थोडं गुलाबजल आणि एक चमचा मध घेऊन ते चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात कोरफडचा लगदा घाला आणि परत मिक्स करा. त्यानंतर ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि वीस मिनिटे तसंच राहू द्या. ब्युटीशियनच्या मते, यामुळे तुमचा चेहरा मुलायम आणि चमकदार दिसेल.
तेलकट त्वचेसाठी:तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मुरुमांचा त्रास होतो. अशा लोकांनी कोरफडीची पाने पाण्यात थोडा वेळ उकळून त्याचा पेस्ट तयार करावा. पेस्टमध्ये मधाचे काही थेंब टाकून चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांनी थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. आठवड्यातून एक दिवस हे केल्यानं चांगले परिणाम मिळतील, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
मुरुमांवर परिणाम: मुरुम ही मुलींसाठी सर्वात मोठी समस्या आहे. पिंपल्स होण्याची चिंता त्यांना नेहमी सतावत असते. पिंपल्सचे डागसुद्धा चेहरा खराब करतात. तज्ज्ञांच्या मते, हे कमी करण्यासाठी कोरफड उत्तम पर्याय आहे. ज्या ठिकाणी मुरुमांची समस्या असेल अशा ठिकाणी एलोवेरा पल्पमध्ये गुलाब जलाचे दोन थेंब मिसळून चेहऱ्याला लावावं. यामुळे त्वचेला पोषण आणि आराम मिळते.